पुणे / प्रतिनिधी :
कसबा विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली असल्याने अखेर कसब्याचा ‘हुकमी एक्का’ खासदार गिरीश बापट यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहानुसार प्रकृती खालावली असतानाही गुरुवारी प्रचाराच्या रिंगणात उतरले. बापट यांनी केसरीवाडय़ात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत कार्यकर्त्यांमध्ये मार्गदर्शन केले. पोटनिवडणुकीत भाजप उमेदावराच्या पाठीशी ताकदीने उभे रहा आणि विचार तसेच विकासावरील निष्ठा मतपेटीतून पुन्हा व्यक्त करा, असे आवाहन बापट यांनी केले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाहीर प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा आहेत. मात्र कसब्यातील मतदार भाजपच्या पाठीशी अनेक दशेक भक्कमपणे उभा राहिला आहे. यावेळीही तो राहणार आणि विजयाची परंपरा कायम राहणार, हा विश्वास आहे. भाजपचा हिंदुत्वाचा विचार, विकास आणि राष्ट्रीयत्वाशी नाते सांगणार आहे. त्यामुळे कसबा भाजपला साथ देत आला आहे. कसबा म्हणजे भाजप, कसब्यात कमळच हेच समीकरण आहे. हेमंत रासने यांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी नेहमीच कार्यक्षमतेने पार पाडली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपच्या पाठीशी ताकदीने उभे राहा. विचार आणि विकासावरील निष्ठा मतपेटीतून व्यक्त करा, असे आवाहन करणारे पत्र बापट यांनी दिले. त्याचे वाचन मेळाव्यात करण्यात आले. कसब्यात चुरशीची लढाई होणार नाही. विजयनानंतर आनंदोत्सवासाठी मी नक्की येईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून खालावली आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी बापट यांची रुग्णालयात जात भाजपसह अन्य पक्षातील नेत्यांनीही भेट घेतली होती. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारात सक्रिय होणार नसल्याचे बापट यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. त्यामुळे बापट निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय राहणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना बापट केसरीवाडय़ात मार्गदर्शन करणार असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी लेखी पत्र देत मनातल्या भावना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविल्या तसेच अवघे काही मिनिटांसाठी संवाद साधत निवडणुकीत विजय होणार असल्याचे बापटांनी यावेळी सांगितले.