Tarun Bharat

पाचगावात खा. महाडिक गट विरुद्ध आ. सतेज पाटील गटात चुरस

शिवसेनेमुळे निवडणुकीत चुरस; सरपंच पदासाठी ची लढत सुवर्णा भिकाजी गाडगीळ विरुद्ध प्रियंका संग्राम पाटील

दयानंद जाधव / पाचगाव

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील संवेदनशील असणाऱ्या पाचगाव ग्रामपंचायत मध्ये खासदार धनंजय महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील गटात चुरशीची लढत होणार आहे. सुमारे 20,000 मतदान असणाऱ्या पाचगाव मध्ये सहा वॉर्ड व 17 ग्रामपंचायत सदस्य आणि एक लोकनियुक्त सरपंच पद आहे. मागील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाने 15 जागांसह लोकनियुक्त सरपंच पद ही आपल्या गटाकडे ठेवत ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. तर खा. धनंजय महाडिक गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

पाचगावचे सरपंच पद खुल्या महिला गटासाठी राखीव आहे. यामुळे या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासाठीही दोन्ही गटाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. खा. धनंजय महाडिक गटाने भिकाजी गाडगीळ यांच्या पत्नी सुवर्णा भिकाजी गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुवर्णा गाडगीळ या भाजपा पक्षामार्फत निवडणूक लढवणार आहेत. तर आमदार सतेज पाटील गटाने विद्यमान लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. प्रियंका संग्राम पाटील या काँग्रेस पक्षामार्फत निवडणूक लढवणार आहेत.

शिवसेना पक्षामधून भारती संतोष ओतारी या सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांना मानणारा मोठा गट पाचगाव परिसरात आहे. शिवसेनेमार्फत सरपंच पदासाठी एक तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे निवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असल्यामुळे सरपंच पदाची उमेदवारी देताना दोन्ही गटाच्या नेत्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार व सरपंच पदाचा उमेदवार यांचा विचार करावा लागला आहे.

पाचगाव मध्ये कोणतीही निवडणूक असली तरी ती निवडणूक अटीतटीचीच असते. यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार सतेज पाटील गट की खासदार धनंजय महाडिक गट ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवतो याबद्दल पाचगाव ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे. आमदार सतेज पाटील व काँग्रेस गटामार्फत भैरवनाथ उपनगर विकास आघाडी तरखासदार महाडिक व भाजप यांच्यावतीने भैरवनाथ महादेव उपनगर विकास आघाडी मार्फत निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत.

Related Stories

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या गोयलच्या पोस्टरला कोल्हापुरी चपलांचा प्रसाद

Archana Banage

तर एकही लस पुण्याबाहेर जावू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

Archana Banage

Kolhapur; मंत्री मुश्रीफ यांनी शाहूनगर वसाहती मधील लोकांना बेघर केले- समरजितसिंह घाटगे

Abhijeet Khandekar

‘हर घर तिरंगा, हर घर संविधान’

Archana Banage

चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार

Archana Banage

कोरोनामुळे अक्षय तृतीया मुहूर्तावर लाखोंची उलाढाल ठप्प

Archana Banage