दरात भरमसाट वाढ : शेतकऱयांच्या अर्थकारणावर परिणाम : दरावर त्वरित नियंत्रणाची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
अलीकडच्या काही दिवसांत पशुखाद्यांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. एकूण खर्च आणि उत्पादन यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे पशुखाद्यांच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱयांतून जोर धरू लागली आहे.
शेतीबरोबरच जनावरे पाळणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दूध उत्पादनात साहजिकच वाढ झाली आहे. दूध उत्पादनासाठी गायी, म्हशींचे पालन केले जाते. दरम्यान, जनावरांना संतुलित आहार म्हणून भुसा, काडीपेंड, मका भरडा, तुरचुनी, कुळीथ आदी खाद्यांचा वापर केला जातो. मात्र, या खाद्यांच्या किमती मागील काही दिवसांत भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय एकूण खर्च आणि दूध उत्पादन यांचा ताळमेळ बसणे अवघड झाले आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शेतकऱयांबरोबरच जनावरे पाळणाऱया गवळी बांधवांची संख्याही अधिक आहे. मात्र, पशुखाद्याचे दर गगनाला भिडल्याने गवळी बांधवही अडचणीत सापडले आहेत. सर्वच पशुखाद्यांचे दर क्विंटलमागे 400 ते 600 रुपयांनी वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान, जनावरांना खाद्य घालणे न परवडणारे झाले आहे. त्यामुळे जनावरे कशी पाळावीत, असा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे. एका दुभत्या जनावराला प्रतिदिन 6 किलो पशुखाद्य लागते. सध्या एका किलोसाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे दूध आणि पशुखाद्याचा खर्च यांचा ताळमेळ बसणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांना नुकसान सोसावे लागत आहे.
दैनंदिन जीवनात अडचणी
जनावरांना पोषक आहार म्हणून भुसा, मका भरडा, तूरचुनी, कुळीथ, शेंगा पेंड, सरकीपेंड आदींचा वापर केला जातो. मात्र या पशुखाद्यांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. दरम्यान, भाताचा कोंडा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे भुशाला मागणी वाढली आहे. एक हजार रुपयांना मिळणारे 50 किलोचे भुसा पोते 1400 रुपये झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांना एका पोत्यामागे 400 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. वाढता पशुखाद्यांचा दर शेतकऱयांच्या मुळावर आला आहे. गवळीबांधव दूध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, पशुखाद्यांच्या किमती वाढल्याने व्यवसायच अडचणीत आला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पशुखाद्यांचे दर …
पशुखाद्य | वजन | किंमत |
भुसा | 50 किलो | 1200 ते 1400 रु. |
काडीपेंड | 50 किलो | 650 ते 1300 रु. |
सरकीपेंड | 45 किलो | 1350 ते 1650 रु. |
मका भरडा | 50 किलो | 1200 ते 1300 रु. |
तूरचुनी | 50 किलो | 1250 रु. |
हरभरा चुनी | 50 किलो | 1280 रु. |
कुळीथ | 100 किलो | 7500 रु. |
शेंगापेंड | 50 किलो | 2100 रु. |
वाढत्या दराने व्यवसाय तोटय़ातच…


पशुखाद्यांच्या किमती अचानक वाढण्यात आल्याने दुधाचे उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय टिकविणे कसरतीचे झाले आहे. वाढत्या दराने व्यवसाय तोटय़ातच करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी आणि सरकारने यामध्ये लक्ष घालून खाद्यांचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी बेकिनकेरे येथील गवळी विनोद भोगण यांनी केली आहे.