माकप नेत्याकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापराचा आरोप
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डाच्या आर्थिक व्यवहारांमधील कथित अनियमिततेप्रकरणी ईडीने माकपचे वरिष्ठ नेते थॉमस इसाक यांना नोटीस बजावली आहे. केआयआयएफबीमधील गैरव्यवहारांदरम्यान थॉमस हे एलडीएफ सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते.
ईडीने केरळच्या माजी अर्थमंत्र्यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. केआयआयएफबीच्या आर्थिक व्यवहारांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संशयास्पद ठरविले होते. तसेच कॅगने या व्यवहारांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा दावा सीतारामन यांनी केला होता.
पायाभूत प्रकल्पांना निधीपुरवठा करण्यासाठी केआयआयएफबी ही राज्य सरकारची प्राथमिक संस्था आहे. 2019 मध्ये मोठय़ा पायाभूत प्रकल्पांना निधी पुरविण्यासाठी 50 हजार कोटी रुपये जमविण्याच्या स्वतःच्या योजनेच्या अंतर्गत केआयआयएफबीने स्वतःच्या पहिल्या मसाला बाँडच्या माध्यमातून 2,150 कोटी रुपयांचा निधी उभारला होता.
तर थॉमस इसाक यांनी केआयआयएफबीच्या कामकाजाबद्दल ईडीची नोटीस मिळाल्यावर राजकीय लाभासाठी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सोमवारी केला आहे.