‘नोकरीसाठी भूखंड’ घोटाळा प्रकरणी कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर प्रवर्तन निर्देशालयाच्या (ईडी) अधिकाऱयांनी धाड घातली आहे. ही कारवाई ‘नोकरीच्या मोबदल्यात भूखंड’ घोटाळय़ाशी संबंधित आहे. हा घोटाळा लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना झाला होता. लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबिय हे या प्रकरणात आरोपी आहेत.
यादवांच्या कन्या मिसाभारती यांचे दिल्लीतील निवासस्थान, तसेच राजदचे नेते आणि माजी आमदार अबु दोजाना यांच्या कार्यालयांवरही छापे घालण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी दिवसभर सुरु होती. महत्वाची कागदपत्रे या कारवाईत हस्तगत करण्यात आली आहेत, अशी अनधिकृत माहिती देण्यात आली आहे.
15 स्थानांची झडती
शुक्रवारी सकाळपासूनच दिल्ली आणि बिहार येथील एकंदर 15 स्थानांवर कारवाई करण्यात आली. प्रवर्तन निर्देशालयाची अनेक पथके आधीपासूनच सज्ज ठेवण्यात आली होती. त्यांनी विविध स्थानांवर जाऊन एकाचवेळी छापे घातले. किमान पाच घरे आणि 10 कार्यालयलांवर धाडी घालण्यात आल्या आहेत.
आरोपांचा इन्कार
लालू यादव यांच्या कुटुंबियांनी सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. ईडीच्या धाडी राजकीय सूडबुद्धीने घालण्यात येत आहेत. केंद्र सरकार आपल्या विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, याचा उपयोग होणार नाही. हे प्रकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरु राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरुनच हे प्रकार होत असल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला.
प्रकृती बिघडलेली असतानाही…
लालू प्रसाद यावर यांनी प्रकृती सध्या बिघडलेली आहे. तरीही त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोप त्यांच्या आणखी एक कन्या रोहिणी आचार्य यांनी केला. जनताच येत्या लोकसभा निवडणुकीत याचे उत्तर देईल. आम्हाला त्रास देणाऱयांचे भले होणार नाही. निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ असे प्रतिपादन त्यांनी केले.