ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीने 9 ठिकाणी छापेमारी केली आहे. पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, ईडीकडून झाडाझडती सुरू आहे.
छ. संभाजीनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या 40 हजार घरांसाठी 4000 कोटी रुपयांचे कॉन्ट्रक्ट देण्याबाबत निविदा काढण्यात आली होती. यावेळी रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. मात्र, या निविदा एकाच आयपीवरुन भरण्यात आल्याचे उघडकीस आले होते. अटींचा भंग केल्याप्रकरणी महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक आणि भागीदारांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे निविदा अंतिम करणे, कंत्राटदार निश्चित करण्यात गुंतलेले मनपातील तत्कालीन अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले होते.
अधिक वाचा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघे जागीच ठार
दरम्यान, या तक्रारीनंतर प्रधानमंत्री आवास योजनेशी संबंधित कागदपत्रे दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती. या कागदपत्रांच्या तपासणीनंतर ईडीने संबंधित लोकांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापेमारी केली आहे. एकूण नऊ ठिकाणी सकाळपासून ईडीकडून तपास सुरू आहे.