कागल / प्रतिनिधी
ED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचे खंदे समर्थक कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावर आज सकाळी ७ च्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत. यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीसह आयकर विभागानेही छापा टाकला आहे. मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरावर ही टाकल्याची चर्चा आहे. आमदार हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावरही आज सकाळी छापा टाकण्यात आला आहे.


दरम्यान, हसन मुश्रीफ हे कालच सायंकाळीच मुंबईला गेले आहेत. त्यामुळे ईडीचा छापा पडला त्यावेळी आमदार मुश्रीफ हे घरी नव्हते. छापा पडला त्यावेळी मुश्रीफ यांच्या घरी त्यांची पत्नी व साजिद,अबिद व नवीद ही तिन्ही मुले , सुना, नातवंडे असा परिवार घरी आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे चर्चा आहे


आमदार मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडल्याचे समजतात मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी येथील गैबी चौकात येऊन निदर्शने केली व भाजपचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली . त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याचबरोबर प्रकाश गाडेकर यांच्या घराबाहेरही कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे . माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर व हसन मुश्रीफ यांच्य घरात चौकशी करण्याचे काम ईडीचे अधिकारी करत आहेत