इंडोनेशियाकडून पाम तेल निर्यातीवर 28 एप्रिलपासू बंदी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पूर्वीच महागाईच्या झळा सोसणाऱया भारतीयांवरील भार वाढणार असून याचे कारण इंडोनेशिया हा देश ठरला आहे. इंडोनेशियात 28 एप्रिलपासून पाम तेलाचय निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून ही बंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. भारत मोठय़ा प्रमाणावर पाम तेलाची आयात करत असल्याने इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे भारताच्या अडचणी वाढणार आहेत. देशात अगोदरच महाग होत चाललेल्या खाद्यतेलाचे दर आणखीन वाढणार आहेत.
इंडोनेशिया पूर्ण जगात पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. या प्रकरणी मलेशिया दुसऱया स्थानावर आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सद्यकाळात भारत सुमारे 90 लाख टन पाम तेलाची आयात करतो आणि यातील 70 टक्के पाम तेल इंडोनेशियाकडून भारताला पुरविले जाते. तर 30 टक्के पामतेल मलेशियाकडून आयात केले जाते.
2020-21 मध्ये भारताने 83.1 लाख टन पाम तेलाची आयात केली होती. इंडोनेशियाच्या या निर्णयानंतर भारतात पाम तेलाच्या आयातीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. अशा स्थितीत भारताला आता मलेशियावरील निर्भरता वाढवावी लागेल. या नव्या स्थितीमुळे आगामी काळात देशात खाद्यतेलाचे दर अधिकच वाढण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट प्रभाव महागाईने त्रस्त सर्वसामान्य जनतेवर होणार आहे.
खाद्य महागाई वाढणार
इंडोनेशियाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जागतिक खाद्य महागाई दरात वाढ होऊ शकते. खाद्य महागाई दर रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे यापूर्वी उच्चांकी स्तरावर आहे. युद्धामुळे सूर्यफुल तेलाचा पुरवठा अडचणीत आला आहे. आता इंडोनेशियाकडून पाम तेलाची निर्यात रोखण्यात आल्यावर महागाई अधिकच वाढणार आहे. केंद्र सरकार आता पाम तेलाच्या उत्पादनावर भर देत आहे. नॅशनल मिशन ऑफ एडिबल ऑइल अंतर्गत 2025-26 पर्यंत भारतात पाम तेलाचे उत्पादन तीनपट करण्याचे लक्ष्य आहे.
इंडोनेशियाकडून यापूर्वीही बंदी
यापूर्वी देखील इंडोनेशियाने जानेवारीमध्ये पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु मार्च महिन्यात ही बंदी हटविली होती. परंतु यावेळी लागू होणारी बंदी पुढील निर्णयापर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले गेले आहे. इंडोनेशियात पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यतेलाचे दर वाढू लागल्याने तेथील उपादक याची निर्यात करू लागले होते. याचबरोबर वनस्पती तेल पुरवठादार अर्जेंटीनाने सोयाबीन तेलावरील निर्यात कर वाढविला आहे.