बँकखाते सील ः 5,551 कोटींची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली, बेंगळूर / वृत्तसंस्था
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) स्मार्टफोन निर्माता ‘शाओमी’वरील कारवाई तीव्र केली आहे. शनिवारी याप्रकरणी मोठी कारवाई करत ‘शाओमी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’च्या बँक खात्यांमध्ये जमा असलेले 5551.27 कोटी रुपये जप्त केले. कंपनीने केलेल्या फसवणुकीप्रकरणी ईडीने विदेशी चलन व्यवस्थापन कायदा, 1999 अंतर्गत ही कारवाई केल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘शाओमी इंडिया’ ही चीनमधील समूहाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. शाओमी इंडिया कंपनीने देशाबाहेर बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याच्या आरोपासंदर्भात ईडीने गेल्या तीन-चार महिन्यांपासून चौकशी सुरू केली होती. अखेर काही व्यवहारांमध्ये पारदर्शकता दिसून न आल्याने ईडीने कंपनीच्या बँक खात्यांमध्ये असलेली 5,551.27 कोटी रुपयांची रक्कम ईडीने जप्त केली आहे. विदेशी चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच परदेशात पैसे पाठवतानाही कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे. शाओमी इंडिया कंपनीने 2014 मध्ये भारतात आपले कामकाज सुरू केले आणि 2015 मध्ये पैसे बाहेर पाठवण्यास सुरुवात केली. विदेशी चलनाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत परदेशातील तीन संस्थांशी अवैधपणे व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. यात रॉयल्टीच्या नावाखाली देव-घेव व्यवहार झाल्याचेही ईडीच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे. सदर व्यवहार करण्यापूर्वी तीन विदेशी संस्थांकडून कोणतीही सेवा घेण्यात आलेली नाही. साहजिकच हे व्यवहार गैरमार्गाने करण्यात आल्याचे आढळून आले आहे