गोवा फॉरवडची टीका, संबंधित शिक्षणाधिकाऱयाला निलंबित करण्याची मागणी
मडगाव : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असलेले शिक्षणखाते गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये म्हादईसंदर्भात जागृती निर्माण करण्यास आडकाठी आणत आहे. शिक्षण खात्याला उद्याचे जे नागरिक आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या प्रश्नावर जागृती झालेली नको का, असा सवाल गोवा फॉरवर्डच्या पर्यावरण विभागाचे निमंत्रक विकास भगत यांनी केला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पर्यावरण विभागाने 1 मार्च रोजी मडगाव येथे म्हादई विषयावर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याचे बार्देश तालुक्याचे शिक्षणाधिकारी किरण चौलसकर यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी म्हादईसंदर्भातील कुठल्याही स्पर्धेत भाग घेऊ नये अशी सूचना बार्देश विभागातील शिक्षकांना पाठवली आहे. यासंदर्भात सोमवारी भगत यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण खात्यावर टीका करताना म्हटले की, आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक असतील. त्यांना भविष्यात जे त्रासदायक ठरू शकते अशा विषयावर त्यांनीच बोललेले शिक्षण खात्याला नको का, असा सवाल त्यांनी केला. म्हादई विषयावर राजकारण नको असे मुख्यमंत्री म्हणतात. पण त्यांचेच शिक्षणखाते अशा प्रकारे राजकारण करत आहे, असा आरोप भगत यांनी केला. गोव्यात म्हादईवर आंदोलन होऊ देणारच नाही असा शब्द मुख्यमंत्र्यानी केंद्र सरकारला दिला आहे का असा सवाल त्यांनी केला. ज्या शिक्षणाधिकाऱयाने या सूचना जारी केल्या आहेत त्यांना ताबडतोब सेवेतून निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. म्हादईचा प्रश्न उठविणाऱयांचा आवाज मुख्यमंत्री बंद करू पाहतात. पण हे दमनतंत्र फार काळ टिकणार नाही. लोकांचा उद्रेक होईपर्यंत मुख्यमंत्र्यानी वाट पाहू नये. लोकांमध्ये उद्रेक झाल्यास मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पाऊल टाकणे मुश्किल होईल, असा इशारा भगत यांनी दिला.