Tarun Bharat

ज्ञान प्रबोधनमध्ये गुरुकुलप्रमाणे शिक्षण!

लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांचे गौरवोद्गार : डिव्हाईन किड्स-ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेच्या रौप्यमहोत्सवाचे उद्घाटन

प्रतिनिधी /बेळगाव

ज्ञान प्रबोधन मंदिर या शाळेतील शिस्त व विद्यार्थ्यांनी मिळविलेली पारितोषिके पाहून आनंद झाला. एखाद्या गुरुकुलप्रमाणे या शाळेचा परिसर आहे. मागील 25 वर्षे मेहनत घेऊन संस्था वाढविण्यात आली आहे. आता ही संस्था मोठी करण्याची जबाबदारी आजी-माजी विद्यार्थ्यांवर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तमात उत्तम शिक्षण घेऊन शाळेचे नाव मोठे करावे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे विचार लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी मांडले.

डिव्हाईन किड्स व ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेचा रौप्यमहोत्सवी उद्घाटन समारंभ सोमवारी जैतनमाळ येथील शाळेत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुमित्रा महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्यासपीठावर बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन, तरुण भारत ट्रस्टचे अध्यक्ष किरण ठाकुर, इंदूर येथील महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्नेहल महाजन उपस्थित होते.

सुमित्रा महाजन पुढे म्हणाल्या, सध्या व्यक्तिमत्त्व विकास किंवा करिअर विकास यासाठी स्वतंत्र क्लासेस लावले जात आहेत. परंतु यापेक्षा तरुणाईला गरज आहे ती चारित्र्य विकासाची. अनुभवाचे ज्ञान हे सर्वात मोठे असते. प्रत्येक मनुष्य हा अनुभवातून शिकत जातो. जे शिक्षण आज तुम्ही घेत आहात त्याचा समाजाला उपयोग झाला तरच त्याचा उद्देश सफल होतो, असे त्यांनी नमूद केले.

किरण ठाकुर म्हणाले, आमची शाळा ही इतर शाळांपेक्षा वेगळी आहे. रशिया, अमेरिका या देशांना भेटी दिल्यानंतर लक्षात आले की, मिलिटरी शिस्तीच्या धर्तीवर एखादी शाळा सुरू करावी. त्या प्रयत्नातून ज्ञान प्रबोधन मंदिर उभे राहिले. छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, 1600 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, क्रीडा स्पर्धा यासह विविध उपक्रमांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. राष्ट्रप्रेमी युवक तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी जयोस्तुते या गीताने राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी स्वागत केले. सचिव जगदीश कुंटे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रिया भाटी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. स्नेहल महाजन यांनी बेळगावकरांचे तसेच किरण ठाकुर यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन चिंचणीकर व तन्वी इनामदार हिने केले. रेबेका यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Related Stories

बेळगावात धुडगूस घालणारी जोडगोळी गजाआड

Amit Kulkarni

खानापूर मलप्रभा नदीत वडगावचा युवक बुडाला

Tousif Mujawar

तिसऱया दिवशीही कोरोना रुग्णांचा दीडशेचा टप्पा पार

Amit Kulkarni

आरओ प्लँट ठरले कुचकामी

Amit Kulkarni

खानापूर रोडवरील ‘ती’ट्रॉली बनतेय अपघाताला निमंत्रण

Amit Kulkarni

शिवजयंती मिरवणूक शांततेत साजरी करा

Amit Kulkarni