कंपनीने निर्यातीत केलेल्या वाढीबद्दल दक्षिण विभागाचा पुरस्कार
प्रतिनिधी /बेळगाव
येथील उद्योजक दिलीप चिटणीस व पराग चिटणीस संचालित हायलॉक हायड्रो टेक्निक प्रा. लि. ला इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल म्हणजेच ईईपीसी इंडियाचा दक्षिण विभागाचा पुरस्कार मिळाला आहे. कंपनीने निर्यातीमध्ये कमाल वाढ केल्याबद्दल या पुरस्काराने हायलॉकला गौरविण्यात आले आहे.
गेल्या 36 वर्षांत ईईपीसी इंडियाने भारतातून अभियांत्रिकी वस्तुंच्या निर्यात क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. 1955 साली 1 कोटी अभियांत्रिकी वस्तुंच्या निर्यातीपासून 2019-20 साली ही निर्यात 76 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कामगिरीमुळे केंद्रीय आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने भारतातील उत्कृष्ट ईईपीसी म्हणून गौरविले आहे.
ईईपीसीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग आहेत. हायलॉकला दक्षिण विभागाचा पुरस्कार मिळाला आहे. हायलॉक हैड्रोटेक्निकने कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही उत्तम निर्यात केली आहे. 1974 पासून सदर कंपनी हायड्रोलिक टय़ुब फिटींग, हायड्रोलिक व्हॉल्व्ज, पाईप फ्लेंजीस व डायग्नोस्टिक कपलिंग्जची अमेरिकेला निर्यात करते. कंपनी आपल्याला मिळालेले कोणतेही पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्या कर्मचाऱयांना सोबत घेऊन जाते.
या पुरस्कार वितरणप्रसंगी कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप चिटणीस, कार्यकारी संचालक पराग चिटणीस यांनी सेल्स मॅनेजर अनुराग पाटील, चीफ डिझाईन इंजिनिअर गोपाळ देशपांडे यांच्या समवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते बेंगळूर येथे हॉटेल फोर सिझन्स येथे हा पुरस्कार स्वीकारला. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.