Tarun Bharat

ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर

महागाव/प्रकाश चौगुले

गडहिंग्लज तालुक्यात 30 ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महागावसह परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला आहे. या निवडणुकीत पारंपरिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरील प्रचाराने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याने सोशल मीडियावर प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडत आहे.

फोटो, व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मोठय़ा प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग म्हणून सोशल मीडियाचा वापर ग्रामपंचायत निवडणुकीत होत आहे. निवडणुका म्हटल्या की प्रचार आणि प्रभागात मोठमोठे होर्डिंग लावून जाहिरात करणे आलेच; परंतु यंदाच्या अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर पोस्टचा अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस पडत आहेत. त्यावर उमेदवाराकडून मतदानाचे आवाहन व एकमेकांच्या उमेदवारांना करण्यात आलेले ट्रोल यामुळे निवडणुकीत सोशल मीडिया जोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही उत्साही कार्यकर्त्यांनी आपापल्या पॅनलचे व प्रभागातील उमेदवारांचे फोटो स्टेटसवर ठेवून वेगवेगळ्या गाण्यांचे, प्रसिद्ध व वक्त्याच्या तोंडची वाक्ये व संगीताची जोड देऊन दिवस-रात्र सोशल मीडियावर अपडेट राहात आहेत.

प्रत्येक आघाडीने गावातील दैवतांना श्रीफळ वाढवून, गावातून पदयात्रा काढून प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाचा तरुणाईकडून मोठय़ा प्रमाणात वापर होताना दिसत आहे. यातून ग्रामपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी गावागावात घडणाऱया प्रत्येक घटनेची कानोकान खबर सोशल मीडियावर मिळत आहे. काही प्रभागातील उमेदवाराकडून सकाळी उठल्यापासून मतदारांना सातत्याने भविष्यात आपण किती उत्कृष्ट काम करणारा उमेदवार आहे, अशी माहिती पाठवली जात आहे. या निवडणुकीत सर्वच आघाडय़ाने सोशल मीडियाचा प्रचारात वापर सुरू करून आघाडी घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करत ग्रामपंचायत निवडणुकीचे सत्ता जिंकण्यासाठी सर्वच पॅनलचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्यामुळे या माध्यमाचा फायदा कोणत्या गटाला होणार? यात कोण बाजी मारणार? हे 20 डिसेंबरनंतरच कळणार आहे, हे मात्र नक्की.

Related Stories

जलशुद्धीकरणासाठी कोल्हापुरात पहिल्यांदाच तरंगत्या तराफ्यांचा प्रयोग

Kalyani Amanagi

कोल्हापूर : शिरोळमधील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 5 जण निगेटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगर वीज वितरण कार्यालयाचा कारभार सुधारा : करवीर शिवसेना

Archana Banage

पटट्य़ाच्या बाहेरील साहित्य जप्त

Archana Banage

प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचे निधन

Archana Banage

नवीन अंगणवाड्य़ांसाठी प्रस्ताव मागवा

Archana Banage