सेन्सेक्स 215 अंकांनी घसरला ः रिलायन्स, बजाज नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारच्या पतधोरण बैठकीमध्ये व्याजदरामध्ये जवळपास 0.35 टक्क्यांची वाढ करणार असल्याची घोषणा केल्यामुळे बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक सलग चौथ्या सत्रात 215 अंकांनी घसरुन बंद झाला.
दिग्गज कंपन्यांमध्ये आठवडय़ातील तिसऱया सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा स्टील यांचे समभाग विक्रीत राहिले. यासह विदेशी गुंतवणूकदारांनीही बुधवारच्या सत्रात पाठ फिरवल्याने देशातील बाजार घसरणीत राहिला. याचा प्रभाव म्हणून आशियातील बाजारांमधील नकारात्मक कामगिरीचा परिणाम हा देशातील बाजारावर झाल्याचे दिसून आले.
बुधवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 215.68 अंकांनी प्रभावीत होत 0.34 टक्क्यांसोबत 62,410.68 अंकांवर बंद झाला आहे. ही सलगची चौथी घसरण राहिली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक दिवसअखेर 82.25 अंकांनी घसरुन 18,560.50 बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये एनटीपीसीला सर्वाधिक दोन टक्क्यांचे नुकसान झाले. यासोबत बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज व सन फार्मांचे समभाग घसरणीत बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन ऍण्ड टुब्रो, ऍक्सिस बँक आणि आयटीसी यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले.
आरबीआय निर्णयाचा परिणाम
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपोदरात 0.35 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा परिणाम हा भारतीय बाजारात नकारात्मक झाला आहे. मे महिन्यापासून आतापर्यंतची ही सलगची पाचवी व्याजदर वाढ असल्याने याचा प्रभाव देशातील बाजारावर झाला आहे.
आशियातील अन्य बाजारात शांघाय, हाँगकाँग, सोल आणि टोकिओच्या निर्देशांकात मोठी घसरण राहिली. युरोपच्या बाजारात दुपारपर्यंत वाढीची नोंद केली होती. याच दरम्यान कच्चे तेल 1.56 टक्क्यांनी घसरुन 78.11 डॉलर बॅरेल इतके राहिले आहे.