पार्टी केल्यानंतर बिलावरुन केला वाद : शिवीगाळ करत बिल न भरण्याची दिली धमकी
प्रतिनिधी /पणजी
ज्या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवर ताव मारतोय तेथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, याची जाणीव असूनही ज्यादा बिल लावल्याचा दावा करुन हॉटेल मालकाला शिवीगाळ करुन बिलाची रक्कम वाढवून दिल्याचे सांगत बिलाची रक्कमच न भरण्याची धमकी दिलेल्या आठ पोलिसांना खात्याने बुधवारी निलंबीत केले आहे.
पोलीसही समाजामध्ये कसे उद्धट वागत असतात, त्याची अनेक उदाहरणे लोकांना पहायला मिळत असून त्याचा त्रासही अनेकांना सोसावा लागतो. साळगाव येथील या ताज्या घटनेमुळे या पोलिसांनी स्वतःच्याच खात्याची लक्तरे वेशिवर टांगल्याचे स्पष्ट झाल्याने खात्याने त्यांना त्वरित निलंबीत केले आहे.
बिलाच्या नावाखाली धांगडधिंगाणा
मंगळवारी रात्री पोलीस खात्यातील एका पोलीस गटाने सांगोल्डा येथील बारमध्ये पार्टी करण्याचा बेत केला आणि साधारणतः आठजणांचा गट या पार्टीला गेला. पार्टींच्यावेळी अनेक खाद्य पदार्थांची ऑर्डर देण्यात आली. सर्वांनी पदार्थांवर ताव मारला. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र, बिल समोर आले ते पाहून ही पोलीस मंडळी चक्रावून गेली. बिल वाढवून दिलेले आहे, असा दावा पार्टीतील काहीनी केला आणि यावरुन हॉटेल मालकाकडे हुज्जत घालण्यात आली. शिवीगाळही करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा
बिलाची रक्कम वाढवून दिल्याने ती रक्कम न देण्याची धमकी देत हे पोलीस सांगोल्डाच्या त्या हॉटेलातून निघून गेले. पोलिसांना चांगली सेवा देऊनही पदरी एक पैसादेखील न आलेल्या हॉटेल मालकाने साळगाव पोलीस स्थानकात तक्रार केली. ज्या पुराव्यावर आधारुन पोलीस सर्व गुन्हय़ांचा तपास करतात तोच पुरवा म्हणजे या हॉटेलातील सीसीटीव्ही फुटेज हॉटेल मालकाने पोलिसांकडे दिले.
मंगळवारी मध्यरात्रीच हा प्रकार पणजीतील पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या कानी पडला होता. मात्र, बुधवारी सकाळी सीसीटीव्ही पुराव्याच्या आधारे पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी आठ पोलीस कर्मचाऱयांना सेवेतून निलंबित केले.
शिवीगाळ केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला जातो. सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यावर आधारुन साळगाव पोलीस या सर्व संशयित आरोपी पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंद करुन न्यायालयात आरोपपत्र सादर करणार का असा सर्वसामान्यांना सवाल पडलेला आहे. या एकंदर प्रकरणामुळे सध्या पोलीस खात्याची नाचक्की होत असल्याचे दिसून येत आहे.
मडगाव पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची टांगती तलवार
मडगाव पोलीस विभागातील एक उपनिरीक्षक लवकरच निलंबीत होण्याच्या मार्गावर आहे. डय़ुटीवर असताना हा पोलीस अधिकारी एका महिलेच्या संपर्कात आला. कालांतराने तिला एका हिल स्टेशनवर फिरवून काही दिवसांनी गोव्यात आला. तिने अनेक गोड आठवणी व्हिडियोच्या रुपाने बंदिस्त करुन ठेवल्या होत्या. मात्र पाल कोठे चुकचुकली? हे कुणाला कळले नाही. तिने दक्षिण गोव्याच्या पोलीस अधिक्षकांच्या कानी हा प्रकार घातलेला असल्याने सध्या या पोलीस उपनिरीक्षकाच्या डोक्यावर निलंबनाची तलवार टांगत आहे.
निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे पुढील प्रमाणे आहेत. फोंडा वाहतूक कक्षाचे प्रज्योत पी. फडते, प्रणेश व्ही. फडते, वास्को वाहतूक कक्षाचे पोलीस जयेश आगरवाडेकर, एसबी पणजी शाखेचे पोलीस नितेश बोरकर, वास्को पोलीस स्थानकाचे वासू कोरगावकर, कळंगूट पोलीस स्थानकाचे सुनिल म्हाळशेकर, अशी असून उर्वरीत दोघांची नावे कळू शकलेली नाही.