वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, गौंडवाड, अलतगा आदी गावांमध्ये रविवारी आषाढी एकादशी पारंपरिक पद्धतीने सावळय़ा विठुरायाला स्मरून उत्साहात साजरी करण्यात आली.
आषाढी एकादशीनिमित्त वरील सर्व गावांतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरांवर विद्युत रोषणाईचा झगमगाट दिसून येत होता. ध्वनिक्षेपकामधून सुरू असलेल्या भक्तीगीतांमुळे प्रत्येक गावात जणू पंढरीच अवतरल्याचा भास होत होता.
रविवारी सकाळपासूनच सर्व गावातील मंदिरासमोर श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होता.
कंग्राळी बुदुक येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण व सेंट्रेंग कंत्राटदार विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी हभप बसवंत मंगाणाचे व हभप मल्लाप्पा निलजकर यांच्या हस्ते उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात
आले.
रविवारी संपूर्ण दिवसभर कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, गौंडवाड, अलतगा गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये भाविकांनी श्री विठ्ठल, रखुमाई, ज्ञानदेव-तुकाराम….असा गजर करत पंढरीचा पांडुरंग आपल्या गावातच भेटला अशा भावनेने दर्शन घेतले.