निष्ठावंत शिवसैनिकाची गुवाहाटीत जाऊन हाक,
प्रतिनिधी/ सातारा, म्हसवड
गुवाहटी येथे रॅडीसन ब्ल्यु हॉटेलमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार गेल्या चार दिवसांपासून थांबले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याकडे लागून आहेत. असे असतानाच सातारा जिह्यातील माण तालुक्यातील उपजिल्हा प्रमुख संजय भोसले हे शुक्रवारी गुवाहाटीत पोहचले. त्यांनी हॉटेलबाहेर शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही परत चला अशा आशयाचे बोर्ड लावून आंदोलन करत असल्याची बाब निदर्शनास येताच आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांनीही केलेल्या या आंदोलनामुळे त्यांचे जिह्यातील शिवसैनिकांकडून कौतुक होत आहे.
माण तालुक्यातील संजय भोसले हे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख आहे. जेव्हा माण तालुक्यात शिवसेनेत बडी आसामी नव्हती तेव्हापासून सर्वसामान्यांसाठी शिवसेना म्हणून संजय भोसले हे आंदोलन करुन न्याय देण्याचे काम करत असतं. शेवटपर्यंत एकटेच लढत राहणे ही त्यांची ख्याती माण तालुक्यात ज्ञात आहे. सध्याच्या शिवसेनेतील घडत असलेल्या राजकीय नाटय़ावर संजय भोसले यांनी थेट गुवाहाटी गाठली. तेथे पोहचून त्यांनी हॉटेलच्या बाहेर परिसरातील रस्त्यावर शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे भाई आप वापस चलो, उद्धवजी, आदित्यजीको साथ दो, असा बोर्ड लावून विनंती करत असल्याची बाब आसाम पोलिसांच्या निदर्शनास येताच आसाम पोलिसांनी त्यांना अटकेची कारवाई केली.
ही कारवाई होत असताना संजय भोसले म्हणाले, मी शिवसैनिक आहे. मी त्यांना विनंती करायला आलो आहे. मी कुठेही येवू शकतो. मी माझ्या जिवाची बाजी शिवसेनेसाठी लावू शकतो, असे त्यांनी सांगितले. तर मीडियाकडे पोलिसांनी सांगितले की आम्ही त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन खाऊपिऊ घालून त्यांची चौकशी करुन त्यांना सोडून देऊ, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भोसलेंच्या या आंदोलनामुळे ते जिह्यात चांगलेच गाजू लागले.
फटाके वाजले अन् पोवई नाक्यावर झाली पळापळ…
शिवसेनेतील जवळपास 41 आमदार-मंत्री बंड करुन गुवाहाटीत हॉटेलमध्ये राहिले आहेत. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडीमुळे सातारकरांच्यासह अवघे महाराष्ट्रवासियांच्या मनाची घालमेल सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी सायंकाळी पोवईनाक्यावर अचानक फटाके वाजल्याचा आवाज आला अन् सर्वांची पळापळ पोवईनाक्याकडे सुरू झाली. अनेकांनी फोनाफोनी केली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानासमोर हे फटाके वाजल्यामुळे याला विशेष महत्व आले होते. परंतु हे फटाके एका केक शॉपच्या उद्घाटन समारंभानिमित्त वाजल्याचे कळाल्यानंतर सातारकर निर्धास्त झाले.