ऑनलाईन टीम/तरुण भारत
मंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर माविआ सरकार धोक्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bbhagat Singh Soshyari) यांनी ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितले असताना एकनाथ शिंदेही उद्या मुबंईत येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेले असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. सर्व आमदारांसह ते उद्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनीच दिली. त्यांनी आज गुवाहाटीत पत्रकारांशी संवाद साधला.
बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आज पहाटेच कामाख्या देवीच्या दर्शानाला गेले होते. दर्शन करून आल्यावर पत्रकारांनी त्यांना घेरलं. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला चांगले सुगीचे दिवस येवोत, महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान मिळावं म्हणून देवीचं दर्शन घ्यायला आलोय. देवीचं आशिर्वाद घ्यायला आलो आहे. माँ कामाख्या देवीच्या भूमिमध्ये आल्यावर तिचं दर्शन घेणं हा श्रद्धेचा भाग झाला. महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखासाठी समृद्धीसाठी दर्शन घेतलंय.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या परतीबाबत विचारलं असता ते म्हणाले की आम्ही उद्या सर्व आमदारांसह मुंबईत पोहोचणार आहोत. मुंबई पोहोचवल्यावर फ्लोअर टेस्टसह ज्या इतर प्रक्रिया राबवायच्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील.
शिंदे गटाचा मुक्काम गोव्यात
शिंदे गटाचे सर्व आमदार आज खाजगी विमानाने (Spice Jet) ४.३० च्या दरम्यान गोव्यात पोहोचतील. एकनाथ शिंदे सह ५१ आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये थांबतील. यासाठी ७१ खोल्या राखीव करण्यात आलेल्या आहेत. त्यांनतर सर्व आमदार उद्या सकाळी मुंबईला पोहचतील.