ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तोषखाना प्रकरणात निवडणूक आयोगाने 5 वर्षासाठी अपात्र ठरवलं आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाचे आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. या कारवाईनंतर खान यांना खासदारकी गमवावी लागण्याचीही शक्यता आहे.
इतर देशांचे सरकार, राष्ट्रप्रमुख, परदेशी राजकारणी तसेच संसद सदस्य आणि नोकरशहा यांच्याकडून मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू या तोषखाना विभागात जमा कराव्या लागतात. हा कॅबिनेट विभागाच्या नियंत्रणाखाली असलेला विभाग आहे. मात्र, पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीररित्या विक्री केल्याच्या आरोप आहे.
अधिक वाचा : राऊतांची दिवाळी कोठडीतच
इम्रान खान यांनी 2018-19 मध्ये त्यांना मिळालेल्या चार भेटवस्तू 58 लाख रुपयांना विकल्या आणि त्यांच्या पावत्या त्यांनी दाखल केलेल्या आयकर रिटर्नमध्ये जोडल्या होत्या. खान यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली होती. यासंदर्भात खासदारांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने खान यांच्या अपात्रतेची कारवाई केली. पाच सदस्यीय खंडपीठानं एकमतानं दिलेल्या निकालानुसार प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपविल्यामुळे खान यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू केली जाईल.