डडेलधुरा मतदारसंघातून पंतप्रधान देउबा सातव्यांदा विजयी
@ काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 21 नोव्हेंबरपासून कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांचा पक्ष नेपाळी काँग्रेस आघाडीवर आहे. नेपाळी काँग्रेसने संसदेत 10 जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला 3 जागा मिळवण्यात यश आले आहे. नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शेर बहादूर देउबा हे डडेलधुरा मतदारसंघातून सलग सातव्यांदा निवडून आले आहेत. नेपाळमधील संसदेच्या एकूण 275 जागांसाठी आणि प्रांतीय विधानसभेच्या 550 जागांसाठी मतदान झाले. देशातील 1 कोटी 80 लाखांहून अधिक मतदार आपले सरकार निवडतील. सर्व जागांचा निकाल आठवडाभरात येण्याची अपेक्षा आहे.
नेपाळमधील निवडणुकांकडे भारताचेही डोळे लागलले आहेत. भारत आणि नेपाळमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारतप्रेमी नेता निवडून येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यमान पंतप्रधान शेर बहादूर देउबा हे भारत समर्थक म्हणून ओळखले जातात. तर, के. पी. शर्मा हे चीनचे समर्थक असल्याचे मानले जाते. के. पी. शर्मा ओली यांनी आपल्या प्रचारात भारत आणि नेपाळमधील कालापानी प्रादेशिक वाद उपस्थित केला होता. वास्तविक नेपाळ हा भारताचाच शेजारी नसून चीनचाही शेजारी आहे. चीनला नेपाळच्या भूमीचा वापर करून भारताला चारही बाजूंनी घेरायचे आहे. अशा स्थितीत देउबा निवडून येणे भारताच्यादृष्टीने योग्य मानले जाते.