सावर्डेतील 2 पंचायती आमदार गणेश गावकर, तर सांगे मतदारसंघातील 5 पंचायती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या ताब्यात
प्रतिनिधी /सांगे
सांगे तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच निवडण्यासाठी झालेल्या प्रक्रियेत सातही ग्रामपंचायतींवर भाजप समर्थक सरपंचांची निवड झाली आहे. त्यामुळे या पंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. सांगे तालुक्यातील सावर्डे मतदारसंघात समाविष्ट असलेल्या काले आणि सावर्डे ग्रामपंचायतांवर आमदार गणेश गावकर समर्थकांची निवड झाली असून सांगे मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उगे, भाटी, वाडे कुर्डी, नेत्रावळी आणि रिवण ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी भाजप समर्थकांची निवड झाली आहे. त्यामुळे या पाचही ग्रामपंचायती स्थानिक आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या ताब्यात गेल्या आहेत. सर्वत्र बिनविरोध निवडी झालेली आहे.
उगे ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने सतत दुसऱयांदा निवडून आलेल्या भारती आनंद नाईक यांची सरपंच, तर राम पांढरमिसाळ यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. भाटी ग्रामपंचायत सरपंचपदी चंद्रकांत देऊ गावकर, तर उपसरपंच म्हणून प्रियांका रुपेश गावकर यांची निवड झाली आहे. वाडे कुर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रज्योत गावकर यांची, तर उपसरपंच म्हणून आंतोनेता नोगुएरो यांची बिनविरोध निवड झाली आहे. नेत्रावळी सरपंचपदी बुंदो वरक यांची, तर उपसरपंच म्हणून फ्रान्सिस (आयेतीन) मास्कारेन्हस यांची बिनविरोध निवड झाली आहे. रिवण ग्रामपंचायत सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्यामुळे तेथे अपेक्षेप्रमाणे वैशाली नाईक यांची सरपंच म्हणून निवड झाली आहे, तर उपसरपंचपदी सूर्या नाईक यांची निवड झाली आहे.
सावर्डे मतदारसंघातील सावर्डे ग्रामपंचायत सरपंचपदी चिन्मयी नाईक, तर उपसरपंच म्हणून नीतेश भंडारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. नऊही पंच बैठकीला उपस्थित होते. सर्व पंचायत सदस्यांच्या सहकार्यातून पंचायतीचा विकास साधण्यावर भर दिला जाईल, असे नवनिर्वाचित सरपंच चिन्मयी नाईक म्हणाल्या. काले सरपंचपदी शैलेश नाईक यांची, तर उपसरपंच म्हणून दिप्ती डी. शिंगाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.