राजेश फळदेसाई व उल्हास सिनारींच्या नावाची चर्चा
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवार 18 रोजी सकाळी 10.30 वा. कुर्टी येथील डेअरी संकुलात निवडणूक होणार आहे. संचालक मंडळाच्या 12 जागांपैकी विठोबा देसाई व राजेश फळदेसाई यांच्या संयुक्त पॅनलने 9 जागा जिंकल्याने या गटातील अध्यक्ष अपेक्षीत आहे. सध्या राजेश फळदेसाई व उल्हास सिनारी हे दोघे इच्छुक असून त्यांच्यात चढाओढ चालल्याचे वृत्त आहे.
गेल्या 19 जून रोजी गोवा डेअरीची निवडणूक होऊन 20 जून रोजी निकाल लागला होता. त्यात विठोबा देसाई व राजेश फळदेसाई यांच्या संयुक्त पॅनलमधून विठोबा देसाई, राजेश फळदेसाई, उल्हास सिनारी, विजयकांत गावकर, गुरुदास परब, बाबुराव फट्टो देसाई, उदय प्रभू, नितीन प्रभूगावकर व बाबू फाळो हे बारापैकी नऊ उमेदवार विजयी झाले होते. माधव सहकारी गटातून स्वतः सहकारी व अनुप देसाई हे तर श्रीकांत नाईक यांच्या पॅनलमधील स्वतः नाईक हे एकमेव उमेदवार विजय झाले होते.
माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई व माजी संचालक उल्हास सिनारी हे एकाच पॅनलमधील दोघे अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने या निवडीबाबत उत्सुकता लागून राहिली आहेत. या दोघांपैकी एकाने तडजोड केल्यास अध्यक्षपदाचामार्ग सुकर होईल, अन्यथा मतदानाचा पर्याय अवलंबवावा लागेल.