एकूण 350 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रदूषण टाळण्याबरोबर खर्चाची बचत करण्यासाठी परिवहनच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारने एकूण 350 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रायोगिक तत्वावर बेंगळूर-म्हैसूर मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरच शहरात इलेक्ट्रिक बस धावणार आहे.
राज्यातील उडपी, मंगळूर, हुबळी, धारवाड, दावणगेरे, चिक्कमंगळूर, शिमोगा, बेळगाव आदी शहरांमध्ये ही बस धावणार आहे. त्यामुळे शहरात लवकरच या वातानुकूलित बस पहायला मिळणार आहेत. या बसमुळे पर्यावरण प्रदूषण टाळण्याबरोबर डिझेलची बचतदेखील होणार आहे. त्यामुळे परिवहनला उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रिक बस लाभदायी ठरणार आहे. सद्य परिस्थितीत बेंगळूर शहरात धावत असलेल्या बस इतर शहरांतदेखील धावणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास सर्व मार्गांवर या बस दिसणार आहेत.
केएसआरटीच्या ताफ्यात 350 बस दाखल झाल्या आहेत. मात्र चार्जिंग स्टेशनचा अभाव आणि इतर कारणांमुळे इलेक्ट्रिक बस थांबल्या आहेत. चार्जिंग स्टेशनची उभारणी झाल्यानंतर सर्वत्र इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. या इलेक्ट्रिक बसमध्ये इमर्जन्सी अलार्म, प्रथमोपचारपेटी, मोबाईल चार्जिंग, आपत्कालिन खिडकी यासह इतर सुविधा आहेत. शिवाय ही बस प्रती किलो मीटरला 1.2 ते 1.4 केडब्ल्यूएच विजेचा वापर करते. साधारण दोन तीन तासांमध्ये पूर्ण चार्जिंग झाल्यानंतर 200 ते 250 किलो मीटर धावू शकते. शिवाय शंभर प्रवासी क्षमतेची ही बस आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास देखील सुखकर होणार आहे.