ब्लॅक संडेमुळे गणेशभक्त हैराण
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने जय्यत तयारी केली जात आहे. परंतु रविवारी संपूर्ण शहरात ब्लॅक डे असल्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला खो बसला. वीजपुरवठा ठप्प असल्याने खरेदीलाही फटका बसला. गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करता आली नाही का? असा प्रश्न भाविकांमधून विचारण्यात येत होता.
सलग दुसऱया रविवारी शहरातील विविध भागात दिवसभर वीजपुरवठा खंडित केला होता. टिळकवाडी काँग्रेस रोड, गोवावेस, खानापूर रोड, पाटील गल्ली, शिवाजी रोड, कॉलेज रोड, बसवाण गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, गणपत गल्ली, बुरूड गल्ली, कॅम्प, कडोलकर गल्ली या मध्यवर्ती भागासह शहापूर व उत्तर भागातही वीजपुरवठा बंद होता. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. घरांची स्वच्छता, डेकोरेशन, सजावट, खरेदी केली जात होती. परंतु वीज नसल्यामुळे या सर्वच कामांना खो बसला.
गणेशोत्सवात तक्रारी जाणवू नये यासाठी दुरुस्ती
गणेशोत्सवाच्या काळात वीजेच्या कोणत्याही तक्रारी जाणवू नये यासाठी दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली होती. बऱयाच ठिकाणी पावसामुळे साहित्याचे नुकसान झाले होते. निकामी साहित्य बदलून त्या ठिकाणी नवीन साहित्य बसविण्यात आले. त्याचबरोबर ट्रान्स्फॉर्मरवर लोड पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
– विनोद करूर (साहाय्यक कार्यकारी अभियंता)