रशियन क्षेपणास्त्रांमुळे वीजपुरवठा व्यवस्था उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियाच्या विरोधातील युद्धादरम्यान युक्रेनचे लाखो लोक चालू वर्षात आता कडाक्याच्या थंडीच्या आव्हानाला सामोरे जाणार आहेत. 271 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने नवा इशारा जारी केला आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या ऊर्जा संकटामुळे देशात थंडीमुळे लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
अलिकडच्या काही आठवडय़ांमध्ये रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील अनेक ऊर्जाकेंद्रांना नष्ट केले आहे. यामुळे युक्रेनमधील घरांमध्ये वीज अन् ऊर्जेच्या अन्य साधनांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. जगातिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक हॅन्स हेन्री क्लयूग यांनी युक्रेनमुळे निम्म्याहून अधिक ऊर्जा केंद्रांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. ऊर्जा पुरवठा ठप्प झाल्याने लोकांच्या आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे.
सध्या कीव्हमध्ये एक कोटी लोक विजेशिवाय राहत आहेत, तर 30 लाख लोक थंडीपासून वाचण्यासाठी स्वतःचे घर सोडू शकतात. युक्रेनमधील थंडी ही जीवघेणी ठरू शकते. एका अनुमानानुसार तेथील अनेक भागांमधील तापमान उणे 20 अंशापेक्षाही खालावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विजेशिवाय तेथे वास्तव्य करणे अशक्य ठरणार आहे.
मानसिक आरोग्यावर परिणाम
युक्रेन युद्धात सातत्याने उदध्वस्त होणाऱया ऊर्जा केंद्रांमुळे लोकांमधील तणाव वाढत आहे. लोक वीजकपातीमुळे त्रस्त झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हिवाळय़ात युक्रेनच्या लोकांना अनेक प्रकारच्या संक्रमणांचा धोका निर्माण होऊ शकतो, रुग्णालयांच्या कमतरतेमुळे हे संकट अधिकच गंभीर ठरू शकते. कोरानामुळे न्युमोनिया आणि श्वसनाशी निगडित गंभीर आजार विक्राळ रुप धारण करू शकतात. रशियाने फेब्रुवारीपासून आतापर्यंत युक्रेनमधील 100 हून अधिक आरोग्य केंद्रांना नष्ट केले आहे. यामुळे तेथील लोकांना आरोग्यविषयक सुविधा मिळणे दुरापास्त ठरले आहे.