मराठी भाषिक विराट मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱयांना देणार निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी कागदपत्रांसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 27 रोजी भव्य मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 11 वाजता सरदार्स हायस्कूलच्या ग्राऊंडपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. मराठी भाषिकांना त्यांच्या भाषिक अधिकारापासून डावलले जात असल्याने या विराट मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सीमावासियांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगावसह संपूर्ण सीमाभागात मोठय़ा संख्येने मराठी भाषिक राहतात. परंतु त्यांना भाषिक अल्पसंख्याक म्हणून देण्यात आलेल्या अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे. सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनदेखील त्यांच्याकडून कानाडोळा केला जातो. 1 जून रोजी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन मराठीतून कागदपत्रे द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने विराट मोर्चा काढला जाणार आहे.
सरदार्स हायस्कूलच्या ग्राऊंडपासून हा विराट मोर्चा काढला जाणार असून, यामध्ये बेळगाव, खानापूर, निपाणी येथील मराठी भाषिक सहभागी होणार आहेत. मराठी कागदपत्रांसाठी सीमावासियांमध्ये जागृती व्हावी यासाठी विभागवार बैठका घेण्यात आल्या. आता जिल्हाधिकाऱयांनी सीमावासियांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती करताना दिसत आहेत. तर महिलादेखील घरोघरी जाऊन मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. म. ए. समितीच्या विराट मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समिती, युवा आघाडी, शिवसेना, युवासेनेच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठी कागदपत्रांसाठी रस्त्यावर उतरणार


शहापूर विभाग समितीच्या बैठकीत निर्धार
लोकशाहीमार्गाने सीमाभागातील मराठी भाषिकांचा भाषेसाठीचा लढा सुरू आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक असल्याने भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारसीनुसार मराठीतून कागदपत्रे देणे आवश्यक आहे. परंतु सीमावासियांना या अधिकारापासून डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने सोमवार दि. 27 रोजी होणाऱया विराट मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहापूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले.
शहापूर विभाग म. ए. समितीची बैठक शनिवारी रात्री कोरे गल्ली येथे पार पडली. या बैठकीत मराठी भाषिकांचे हक्क, सीमाप्रश्नाचा खटला याविषयी कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. मराठीतून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्यानेच विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, महिला आघाडीच्या दक्षिण विभागप्रमुख सुधा भातकांडे, श्रीकांत कदम, अभिजित मजुकर, श्रीधर खन्नूकर, सागर पाटील, माजी महापौर महेश नाईक, रमाकांत कोंडुसकर, सुनील बोकडे, नागेश शिंदे, गजानन शहापूरकर, राजू गावडोजी, रवी जाधव, मनोहर शहापूरकर, मनोहर जाधव, अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे, राजकुमार बोकडे, नागेश कुंडेकर, रणजित हावळाण्णाचे यांच्यासह इतर उपस्थित होते.
शिवाजीनगर येथे जागृती बैठक
शिवाजीनगर येथे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठी कागदपत्रांसाठी काढण्यात येणाऱया महामोर्चाबद्दल चर्चा करण्यात आली. मोर्चात शिवाजीनगर परिसरातून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवाजीनगर येथील कार्यकर्ते व युवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.