संपूर्ण व्यवहार पूर्ण करत घेतला ताबा ः मुख्य अधिकाऱयांना मस्क दाखविला बाहेरचा रस्ता
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
एलॅन मस्क यांच्याकडे आता ट्विटरची धुरा आली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांना बाजूला करत या पदावर ते विराजमान झाले आहेत. दुसरीकडे ट्विटरच्या गुंतवणूकदारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बनावट खात्यांच्या आकडेवारीसह अन्य आरोप त्यांच्यावर केले होते.
आता मात्र एलॉन मस्क हे ट्विटरचे नवीन मालक बनले आहेत. एप्रिलमध्ये सोशल मीडिया कंपनी खरेदी करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा बोली लावली होती. त्याच्या खुप कालावधीनंतर हा टप्पा प्राप्त करण्यात आला असल्याचेही म्हटले जात आहे. यामध्ये जवळपास 44 बिलियन डॉलरचा व्यवहार पूर्ण करत त्यांनी ट्विटरची मालकी प्राप्त केली आहे.
मालक म्हणून मस्क यांनी धुरा हातात घेताच त्यांनी ट्विटरच्या मुख्य चार अधिकाऱयांची उचलबागडी केली आहे. यामध्ये मूळ भारतीय असणारे सीईओ पराग अग्रवाल आणि संचालक विजया गद्दे यांचाही यामध्ये समावेश आहे. या घटनेनंतर दोन्ही अधिकाऱयांनी कंपनीचे सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालय सोडले आहे.
कोण आहेत अग्रवाल
एलॉन मस्क यांनी ट्विटरचे मुख्य अधिकारी राहिलेले पराग अग्रवाल यांना बाजूला केले असले तरी पराग अग्रवाल हे आयआयटी बॉम्बे येथील पदवीधर आहेत. त्यांनी 10 ऑक्टोबर 2011 मध्ये ट्विटरमध्ये प्रवेश केला होता. महसूल व ग्राहक अभियांत्रिकीमधील त्यांच्या कामामुळे ते ट्विटरचे पहिले उत्तम अभियंता बनले. कंपनीने त्यांना ऑक्टोबर 2018 मध्ये ट्विटरच्या सीईओपदी नेमले होते.
कर्मचारी कपात?
द वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार मस्क हे कंपनीचे 7,500 कर्मचाऱयांपैकी 75 टक्के म्हणजे 5,600 कर्मचाऱयांना नोकरीवरुन कमी करणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.