ऑनलाईन टीम / मुंबई :
मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ‘ट्विटर’चा वापर आता पूर्वीसारखा मोफत नसेल. त्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारले जाऊ शकते, असे ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी म्हटले आहे.
एलन मस्क यांनी आज सकाळी यासंदर्भात ट्विट केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ट्विटर सामान्य लोकांसाठी नेहमीच मोफत असेल, मात्र, व्यावसायिक आणि सरकारी कामासाठी ट्विटरचा वापर होत असेल तर त्याला शुल्क आकारले जाऊ शकते. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.”
एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटरची खरेदी केली आहे. हा करार या वर्षी पूर्ण होऊन मस्क यांचे ट्विटरवर पूर्ण नियंत्रण असेल. मस्क ट्विटरमध्ये आमूलाग्र बदल करण्याची शक्यता आहे. युजर्सचा ट्वटिरवर विश्वास वाढावा, यासाठी प्रयत्न करणार आहेत. नवीन फिचर्स देखील आणण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ट्विटरवर मोफत सेवा मिळणार की नाही? हा प्रश्न युजर्संना पडला आहे. याबाबत आता एलन मस्क यांनी ट्विट करून सूचित केलं आहे.