प्रांतीय सरकारचा निर्णय ः प्रतिदन 4-5 बलात्काराच्या घटना
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे तेथील सरकारने ‘आणीबाणी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती प्रांताचे गृहमंत्री अत्ता तरार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंजाबमध्ये महिला आणि मुलांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे वाढत चाललेले गुन्हे समाज आणि सरकारसाठी अत्यंत गंभीर विषय आहे. पंजाब प्रांतात दररोज बलात्काराच्या 4-5 घटना समोर येत ओत. यामुळे सरकारला लैंगिक शोषण, गैरवर्तन आणि अशाप्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुलांना घरी एकटे सोडू नका
कायदा-सुव्यवस्थेवर मंत्रिमंडळ समितीकडून सर्व प्रकरणांची समीक्षा करण्यात येईल. याप्रकरणी नागरी समाज, महिला अधिकार संघटना, शिक्षक आणि वकिलांशीही विचारविनिमय करण्यात येणार आहे. अशाप्रकारच्या घटना रोखण्यावर भर दिला जाईल. आईवडिलांनी मुलांना घरी एकटे सोडू नये असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
बलात्कार विरोधी मोहीम
अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लैंगिक शोषणाबद्दल जागरुक केले जाईल. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने मोहीम सुरू केली आहे. शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांचे वाढते व्यसन गुन्हे वाढण्यामागील महत्त्वाचे कारण ठरत असल्याचे तरार म्हणाले.