अमेरिकेत आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
तीव्र हिमवादळाचा फटका बसल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी न्यूयॉर्कसह काही भागात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क राज्याला सर्व संघीय मदत उपलब्ध करून देण्यात यावी, असे व्हाईट हाऊसमधून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या हिमवादळाने अमेरिकेतील 50 पैकी 48 राज्यांना वेढले आहे.
कोलोरॅडो, इलिनॉय, केंसास, केंटकी, मिशिगन, मिसूरी, नेब्रास्का, न्यूयॉर्क, ओहायो, ओक्लाहोमा, टेनेसी आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये हिमवादळामुळे एकूण 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच कॅनडा ते मेक्सिको सीमेपर्यंत हिमवादळामुळे 56 जणांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क राज्याच्या ईशान्येला असलेल्या बफैलो येथे एका आठवडय़ात सर्वाधिक लोकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत येथे 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भागात एक मीटरपेक्षा जास्त उंचीचा हिमाचा थर निर्माण झाला आहे.
तीव्र हिमवादळ आणि उणे तापमानामुळे शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 3 हजार उड्डाणे रद्द करण्यात आली असून 3,809 विमानांनी विलंबाने उड्डाण केले. हवाई वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच रस्त्यांवर साचलेल्या बर्फामध्ये अनेक वाहने अडकून पडली आहे. मार्गावर विविध प्रकारच्या वाहनांची गर्दी दिसत असून रस्त्यांवरील बर्फ साफ करणे कठीण आहे. आपत्कालीन सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात.