वैद्यकीय आणीबाणीनंतरही प्रवाशाचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिलली
वैद्यकीय आणीबाणीमुळे दिल्लीहून दोहाला जाणाऱया इंडिगो विमानाला पाकिस्तानातील कराची येथे उतरवावे लागले. विमानातील एका व्यक्तीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे विमान कराचीच्या दिशेने वळवावे लागले. मात्र, त्या व्यक्तीला वाचवता आले नाही. विमान कराची विमानतळावर उतरल्यानंतर वैद्यकीय तपासणीअंती संबंधित प्रवाशाला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर विमानातील इतर प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
इंडिगो एअरलाईन्सचे फ्लाईट 6ई-1736 दिल्लीहून कतारमधील दोहा येथे जात असताना एका व्यक्तीची प्रकृती खालावली. त्यानंतर विमानाच्या पायलटने कराची विमानतळावरून आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली. त्यानंतर कराची विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाने फ्लाईटच्या इमर्जन्सी लँडिंगला परवानगी दिली, मात्र त्या व्यक्तीला वाचवता आले नाही, अशी माहिती सोमवारी विमान कंपनीने दिली. वैद्यकीय आणीबाणीच्या कारणास्तव 6ई-1736 या विमानाचा मार्ग वळवण्यात आला होता, परंतु दुर्दैवाने विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने प्रवाशाला मृत घोषित केले. इंडिगोच्या विमानाचे कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याच्या वृत्ताला कराचीतील नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने पुष्टी दिली आहे.