तय्यब ताहिर सामनावीर, निशांत सिंधू मालिकावीर
वृत्तसंस्था/ कोलंबो
भारत अ च्या निशांत सिंधूला ‘मालिकावीर’, पाक अ चा शतकवीर तय्यब ताहिरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून पाक अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. पाक अ ने 50 षटकात 8 बाद 352 धावा जमवत भारत अ संघाला विजयासाठी 353 धावांचे कठीण आव्हान दिले. त्यानंतर भारत अ संघाचा डाव 40 षटकात 224 धावांत आटोपला.
पाक अ संघामध्ये तय्यब ताहिरने 71 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारासह 108, सईम आयुबने 51 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारासह 59, ओमर युसुफने 35 चेंडूत 4 चौकारासह 35, फरहानने 62 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारासह 65, मुबासिर खानने 47 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 35, मुमताजने 2 चौकारासह 13, मोहमद वासीमने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 17 तर कर्णधार मोहमद हॅरीसने 2 धावा जमवल्या. आयुब आणि फरहान यांनी सलामीच्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ताहिर आणि मुबासिर खान यांनी सहाव्या गड्यासाठी 126 धावांची भागीदारी केली. पाक अ च्या डावात 13 षटकार आणि 32 चौकार नोंदवले गेले. भारत अ संघातर्फे राजवर्धन हंगरगेकर, रियान पराग यांनी प्रत्येकी दोन तर हर्षित राणा, मानव सुतार व निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ च्या डावात सलामीच्या अभिषेक शर्माने 51 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 61, साई सुदर्शनने 28 चेंडूत 4 चौकारासह 29, जोशने 1 चौकारासह 11, कर्णधार धुलने 41 चेंडूत 4 चौकारासह 39, निशांत सिंधूने 10, रियान परागने 1 चौकारासह 14, हर्षित राणाने 2 षटकारासह 13 तर हंगरगेकरने 2 चौकारासह 11 धावा जमवल्या. पाक अ संघातर्फे सुफियान मुकीमने 66 धावात 3, अर्षद इक्बाल, मुमताज आणि मोहमद वासीम यांनी प्रत्येकी दोन तर मुबासिर खानने एक गडी बाद केला. भारत अ च्या डावात 3 षटकार आणि 20 चौकार नोंदवले गेले.
संक्षिप्त धावफकल : पाक अ 50 षटकात 8 बाद 352 (तय्यब ताहिर 108, अयुब 59, फरहान 65, युसुफ 35, मुबासिर खान 35, मुमताज 13, मोहमद वासीम नाबाद 7, मोहमद हॅरीस 2, अवांतर 14, हंगरगेकर, रियान पराग प्रत्येकी दोन बळी, राणा, मानव सुतार, निशांत सिंधू प्रत्येकी एक बळी), भारत अ 40 षटकात सर्वबाद 224 (साई सुदर्शन 29, अभिषेक शर्मा 61, जोश 11, यश धुल 39, निशांत सिंधू 10, पराग 14, हर्षित राणा 13, हंगरगेकर 11, अवांतर 15, सुफियान मुकीम 3-66, अर्शदीप इक्बाल 2-34, मुमताज 2-30, मोहमद वासीम 2-26, मुबासिर खान 1-38).