पॅरिस / वृत्तसंस्था
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी सत्ता हस्तगत केली आहे. त्यांनी आपल्या विरोधक मारीन ले पेन यांचा पराभव केला. मॅक्रॉन यांना 58.55 टक्के मते मिळाली तर मारीन ले पेन यांना 41.45 टक्के मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्या विजयानंतर त्यांनी समर्थकांना संबोधित करताना ‘मी आता कुठल्या एका पक्षाचा किंवा विचारसरणीचा राष्ट्राध्यक्ष नसून सगळय़ांचा राष्ट्राध्यक्ष आहे’ असे स्पष्ट केले.
इमॅन्युएल मॅक्रॉन दुसऱयांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांनी नॅशनल रॅली पार्टीच्या उजव्या विचारसरणीच्या उमेदवार मारीन ले पेन यांचा पराभव केला. मॅक्रॉन यांनी गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गानंतरची स्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्यामुळे लोक त्याला पसंत करत होते. 2002 पासून फ्रान्समध्ये कोणताही नेता पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून आलेला नाही, परंतु मॅक्रॉन यांनी ही साखळी तोडली. मात्र, यावेळच्या विजयात त्यांच्या विजयाचे अंतर कमी झाले आहे. 2017 मध्ये मॅक्रॉन यांना 66.1 टक्के मते मिळाली, तर त्यांच्या विरोधकाला 33.9 टक्के मते मिळाली होती.
जागतिक पातळीवरून अभिनंदनाचा वर्षाव
मॅक्रॉन हे फ्रान्समधील मध्यवर्ती (ना उजवे, ना डावे) विचारसरणीचे नेते मानले जातात. त्यांच्या विजयानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे. तसेच सध्या युद्धाची झळ बसलेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही समाधान व्यक्त केले आहे. युपेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी निवडणुकीपूर्वी फ्रान्सच्या मतदारांना मॅक्रॉन यांना मते देण्याचे आवाहन केले होते. मॅक्रॉन यांच्या विजयामुळे युरोपातल्या इतर नेत्यांचा जीव भांडय़ात पडला आहे. फ्रान्समध्ये अतिउजव्या नेत्याची सत्ता आली असती तर त्यामुळे युरोपियन युनियनच्या धोरणांना धक्का पोहचला असता असे त्यांना वाटत होते.
मारीन ले पेन आपल्या वडिलांप्रमाणेच अपशयी ठरल्या आहेत. त्यांच्या पक्षाची धुरा याआधी त्यांच्या वडिलांकडे होती. आता सलग आठव्यांदा त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे, असे फ्रान्समधल्या अतिउजव्या गटाचे नेते एरिक झेमुर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, देशवासियांनी ज्या रागामुळे, मतभेदांमुळे अतिउजव्या नेत्यांना मते दिली, त्या रागावर, त्या मतभेदांवर उत्तर शोधले पाहिजे. ही माझी आणि माझ्या सहकाऱयांची जबाबदारी आहे, असे आपल्या विजयानंतर केलेल्या भाषणात मॅक्रॉन म्हणाले.
भारतासाठी सकारात्मक निकाल
भारताचे फ्रान्सशी चांगले संबंध आहेत. आजवर फ्रान्सचे कोणतेही सरकार भारतविरोधी राहिलेले नाही. मॅक्रॉन यांनीही आपल्या अजेंडय़ावर भारताला प्रथम प्राधान्य असल्याचे सुतोवाच आपल्या रॅलींमध्ये केले होते. ‘युएन’मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सने नेहमीच पाठिंबा दिला आहे. साहजिकच मॅक्रॉन यांचा विजय भारताच्यादृष्टीने सकारात्मक संबोधला जात आहे.
प्रेंच निवडणुका जगासाठी महत्त्वाच्या
6 कोटी 70 लाख लोकसंख्या असलेला फ्रान्स ही जगातील सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पर्यटन आणि लाईफस्टाइल ऍक्सेसरीजसाठी जगप्रसिद्ध, फ्रान्स देखील तिसरी सर्वात मोठी अणुशक्ती आहे. युरोपियन युनियनचे संस्थापक सदस्य असण्यासोबतच, ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी एक आहेत.