वाचणार विजेच्या बिलाचा खर्च
जगभरात कोरोना महामारीनंतर लोकांना आरोग्य आणि काम दोघांमधील संतुलनासाठी वर्क फ्रॉम होम संस्कृती अंगिकारावी लागली आहे. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये हा प्रकार अद्याप सुरू असून लोकांची काम करण्याची पद्धत बदलली आहे. यामुळे कर्मचारी आणि कंपनी दोघांनाही लाभ झाला, परंतु आता यापुढे एक पाऊल टाकत वर्क फ्रॉम पबची संस्कृती समोर येत आहे. यांतर्गत ब्रिटनमध्ये अनेक पब आणि बार आता कर्मचाऱयांसाठी वर्क फ्रॉम पबची ऑफर देत आहेत.
ब्रिटनमधील पब संचालक आता लोकांसाठी वर्क फ्रॉम होमऐवजी ‘वर्क फ्रॉम पब’ची ऑफर घेऊन आले आहेत. वर्क फ्रॉम पब नावाची नवी सेवा स्वतःच्या ग्राहकांना वेगवेगळय़ा प्रकारे देण्यात येत आहे.
ब्रिटनमध्ये पब्सची संख्या मोठय़ा प्रमाणात आहेत. हे पब्स स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी वर्क फ्रॉम पबची ऑफर देत आहेत. लॅपटॉपद्वारे काम करणारे लोक स्वतःच्या घरातील विजेचे बिल कमी करण्यासाठी पबची वाट धरतील अशी अपेक्षा त्यांना वाटत आहे. ‘वर्क फ्रॉम पब’ ऑफरची सुरुवात सुमारे 900 रुपयांपासून आहे. या पॅकेजसोबत लोकांना लंच आणि ड्रिंक देखील पुरविण्यात येत आहे. ब्रिव्हरी यंगच्या 185 पबने 1400 रुपयांमध्ये वर्क फ्रॉम पबची ऑफर दिली आहे. यात सँडविच लंच, चहा आणि कॉफीही मिळणार आहे.
ब्रिटनमध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंग सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत लॅपटॉपवर काम करणारे कर्मचारी पबमध्ये येतील आणि त्यांना यामुळे घराच्या विजेच्या बिलाप्रकरणी दिलासा मिळेल असे पब्स संचालकांना वाटत आहे. सद्यकाळात ब्रिटनमधील लोक विजेच्या वाढलेल्या बिलामध्ये त्रस्त आहेत. अशा स्थितीत पब्सचे मालक ही पद्धत अवलंबून स्वतःचा व्यवसाय वाढवू पाहत आहेत.