पादत्राणे किंवा चामडय़ाच्या वस्तू बनविण्याचा व्यवसाय सर्वसाधारणपणे पुरुष करतात. महिलांनी अशी उत्पादने तयार करणे अजूनही समाजमान्य झालेले नाही. तथापि, बिहारमधील आरा जिल्हय़ातील अनिता नामक महिलेने ही समजूत मोडीत काढली आहे. तरुणवयातच त्यांनी स्वतःची फुटवेअर फॅक्टरी सुरू करून राज्यात एक नवा पायंडा पाडला आहे. शिवाय अन्य महिलांसाठी रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी शहराच्या औद्योगिक विभागात फॅक्टरी टेड झोन नामक एक आऊटलेटही स्थापन केले आहे.
विशेष म्हणजे त्यांना फुटवेअर बनविण्याची कोणतीही परंपरा नाही. त्यांच्या कुटुंबीयांपैकी किंवा पूर्वजांपैकी कोणीही या व्यवसायात कधीच नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यात पदार्पण करण्याचा विचार व्यक्त केल्यानंतर मोठा विरोध झाला. पादत्राणे किंवा चामडय़ाच्या वस्तू तयार करणे हे आपल्याला शोभत नाही. हे आपल्या योग्यतेचे काम नाही, असे त्यांना सांगण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी कोठेतरी नोकरी करावी, असेही सुचविण्यात आले. तथापि, नवा पायंडा पाडण्याचा निर्धार त्यांनी आधीच केलेला असल्यामुळे सर्व विरोध नाकारून त्यांनी या व्यवसायात पदार्पण केले. व्होकल फॉर लोकल या तत्वाचा त्यांच्यावर प्रभाव पडला आहे, असे त्या सांगतात. त्यामुळे परिसरात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीतून फुटवेअर निर्माण करण्याचे त्यांनी मनावर घेतले. आज त्यांच्या कारखान्यातून दररोज 300 हून अधिक जोडय़ा पादत्राणे बाहेर पडतात. कारखाना लहान असला तरी त्यामुळे एक नवी प्रथा सुरू झाली असून अन्य महिलांनाही या व्यवसायात येण्याची प्रेरणा मिळालेली आहे, असे त्या अभिमानाने सांगतात.