बागायत खात्याकडून अनुदान : गतवषी 8991 किलो मधाची निर्मिती : उत्पादनात खानापूर तालुका आघाडीवर
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव, खानापूर तालुक्मयातील वनसमृद्ध भागात मधमाशी पालनाचा विस्तार वाढू लागला आहे. त्यामुळे मधमाशी व्यवसायात रोजगार निर्मितीला चालना मिळू लागली आहे. अनेकांनी जोड व्यवसाय म्हणून मधमाशी पालन सुरू केले आहे. नैसर्गिक मधाबरोबर फ्रेम लावून मध उत्पादन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अलीकडे मधमाशी व्यवसाय पुढे येताना दिसत आहे.
वाढती महागाई, पावसाचा अनिश्चितपणा, अयोग्य हमीभाव, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेती व्यवसाय संकटात येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि आता मधुमक्षिका पालनाकडे शेतकरी वळू लागले आहेत. मागील काही वर्षात हजारो शेतकरी मधमाशी व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे गतवषी जिल्ह्यात 8991 किलो कृत्रिम मधाचे उत्पादन झाले होते. यातून 16.81 लाखांचा महसूल प्राप्त झाला.
बागायत खात्यामार्फत मधमाशी पालनाला अनुदान उपलब्ध करून देऊन प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे मधमाशी पालनाकडे कल वाढू लागला आहे. मधमाशी पालनामुळे परागीभवन होऊन फलोत्पादनात वाढ होते. त्यामुळे बागायतदार आपल्या बागेत मधमाशी पालनासाठी कृत्रिम पेट्या लावून उत्पादन घेऊ लागले आहेत. खात्याच्या अनुदानाची त्याला जोड मिळत असल्याने उत्पादन हळूहळू वाढू लागले आहे.
जिल्ह्यात बेळगाव, खानापूर, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, रामदुर्ग, सौंदत्ती आदी भागात मधमाशी पालन सुरू झाले आहे. विशेषत: खानापूर तालुक्मयातील वनसमृद्धीने नटलेल्या डोंगर परिसरात या व्यवसायाला अधिक चालना मिळू लागली आहे. जांबोटी येथे मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी मोठा प्रकल्प उभारण्यासाठी खात्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात बेळगाव जिल्हा मध उत्पादनात पुढे येईल, असा विश्वास बागायत खात्याने व्यक्त केला आहे.