Tarun Bharat

मुसेवाला हत्येतील चौघांचे एन्काउंटर

मृतांमध्ये दोन शार्पशुटर्सचा समावेश : पंजाबमधील अटारी बॉर्डरजवळ सहा तास चकमक,पाकिस्तानात पलायन करण्याचा बेत हाणून पाडला,घटनास्थळावरून एके-47 रायफलसह स्फोटके जप्त

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंजाबी गायक सिद्धू मुसेवला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी बुधवारी अमृतसरमध्ये चार जणांना चकमकीत ठार केले. भारत-पाकिस्तान सीमेपासून 10 किमी अंतरावर सुमारे सहा तास ही चकमक चालली. मृतांमध्ये जगरूप रुपा आणि मनप्रीत मन्नू या दोन शार्पशुटर्सचा समावेश आहे. तर अन्य दोघांची ओळख पटविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळावरून तपास यंत्रणांना एके-47 रायफलसह अन्य शस्त्रास्त्रे आणि स्फोटके सापडल्यामुळे दहशतवादी संघटनांशी त्यांचे लागेबांधे होते काय? याची शहानिशा केली जाणार आहे. हे सर्वजण अटकेच्या भीतीने पाकिस्तानात पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्यांचा खात्मा करण्यात आला.

गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी बुधवारी शार्पशुटर्सच्या अटकेसाठी विशेष मोहीम राबविली. अमृतसर जिल्हय़ातील चीचा भकना गावात मुसेवालाचे हल्लेखोर लपल्याची माहिती तपास यंत्रणांना लागली होती. सदर हल्लेखोरांनी एका जुन्या हवेलीमध्ये आश्रय घेतला होता. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता बचावार्थ गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. फौजफाटा वाढवून सर्व हल्लेखोरांना शरणागती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, शरणागती न पत्करल्यामुळे अखेर त्यांना चकमकीत ठार करण्यात आले.

मृतांमध्ये जगरूप रुपा आणि मनुप्रीत मनू या दोन गुंडांचा समावेश आहे. मात्र, ठार झालेल्या अन्य दोन हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पंजाब पोलिसांच्या टास्क फोर्सचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रमोद बन यांनी सांगितले. हे गुंड ज्या घरात लपले होते त्या घरातून एके-47 रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सिद्धू मुसेवाला याच हत्यारांचा वापर झालाय की नाही याचा तपास केला जाईल आणि ही शस्त्रे कुठून आली हे शोधून काढले जाईल, असे ते पुढे म्हणाले. मुसेवाला हत्येप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या सर्व शस्त्रांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे.

2 किमी परिसर सील

या चकमकीसाठी तपास यंत्रणांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्स, स्पेशल ऑपरेशन सेल, ऑर्गनाईज्ड क्राइम कंट्रोल युनिट याशिवाय अमृतसर पोलिसांनी 2 किमीचा परिसर सील केला होता. पोलिसांचे बेस्ट शूटर्स आणि जलद कृती दलाची टीमही याप्रसंगी घटनास्थळी उपस्थित होती. या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मनूने झाडल्या होत्या मुसेवालावर गोळय़ा

ठार झालेला शार्पशूटर मनू हा गँगस्टर लॉरेन्स आणि त्याचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार यांच्या जवळचा आहे. 29 मे रोजी मनसाच्या जवाहरके गावात मन्नूने मुसेवालावर एके 47 ने गोळय़ा झाडल्याचे आतापर्यंत अटक झालेल्या साथीदारांच्या जबानीतून स्पष्ट झाले होते. मूसेवाला यांची हत्या करणारे जगरूप रुपा आणि मनप्रीत मनू हे हत्येनंतर पंजाबमध्ये फिरत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ते जून अखेरपर्यंत तरनतारनमधील एका गावात लपून बसले होते. रुपा या परिसरातीलच रहिवासी आहे.

चारजण ठार झाल्याची आमदारांची माहिती

अटारीचे आमदार जसविंदर रामदास यांनी चकमक संपल्याचा दावा बुधवारी सायंकाळच्या सुमारास केला. चीचा भकना गावात झालेल्या या चकमकीत चारजण ठार झाले आहेत. आता पोलिसांकडून गोळीबार होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या इमारतीत गुंड लपले होते ती इमारत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र, पोलिसांकडून अधिकृत दुजोरा येणे बाकी आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

102 व्या घटनादुरूस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी

Archana Banage

देशात 67 हजार 708 नव्या बाधितांची नोंद

Patil_p

नितिश कुमार तनानं भाजपसोबत, मनानं आमच्यासोबत – संजय राऊत

Archana Banage

राजस्थान-बिकानेरमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप

Patil_p

अर्जुन इरिगेसीकडून अनिश गिरी पराभूत

Patil_p

नौदलाला मिळणार अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र

Patil_p