कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष झाल्याने महानगरपालिकेकडून कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा विकास करण्यात येत असून परिसरातील रस्त्यावर दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमणामुळे रहदारी पोलिसांची डोकेदुखी वाढल्याने महापालिकेच्या मदतीने शनिवारी अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच फेरीवाल्यांच्या हातगाडय़ा जप्त करण्यात आल्या.
मध्यवर्ती बसस्थानकाचा विकास करून नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्यात येत आहे. पण स्मार्ट बसस्थानकासमोरील रस्त्यावर दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून ठाण मांडले आहे. परिणामी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर विविध व्यवसाय थाटण्यात आले असून या मार्गावरून बसची वर्दळ मोठय़ाप्रमाणात असते. तसेच मध्यवर्ती बसस्थानकात ये-जा करणाऱया नागरिकांची गर्दी असते. पण फेरीवाल्याच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने रहदारी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सूचना करूनही फेरीवाले रस्त्यावरील अतिक्रमण हटवित नाहीत. तसेच मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत येतो. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे मार्केट पोलीस स्थानक आणि रहदारी खात्याच्या पोलिसांनी महापालिकेला विनंती करून अतिक्रमण हटविण्याची सूचना केली. पोलीस प्रशासनाच्या सूचनेवरून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांच्यावतीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई राबविण्यात आली. शनिवारी चौथा शनिवार असल्याने मनपा कार्यालयाला सुटी होती. पण अतिक्रमण हटविणे आवश्यक असल्याची सूचना केल्याने मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला तातडीने पाचारण करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई राबविण्यात आली.