मनपा-रहदारी पोलीस खात्याची संयुक्त मोहीम
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांवर अतिक्रमण वाढले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याशेजारील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम महापालिका आणि रहदारी पोलीस खात्यामार्फत राबविण्यात येत आहे. तसेच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानक ते आरटीओ सर्कलपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
शहरातील प्रत्येक रस्त्याशेजारी खोकी तसेच विविध टपऱ्या घालून व्यवसाय थाटण्यात आले आहेत. काही ठिकाणी फेरीवाल्यांनी कायमस्वरुपी शेडची उभारणी करून व्यवसाय सुरू ठेवला आहे. फुटपाथवर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवरही व्यवसाय सुरू केला असल्याने वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा बनला आहे. व्यवसाय हटविण्याची सूचना करूनही व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिका आणि रहदारी खात्याच्यावतीने अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी एपीएमसी रोडशेजारील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरासह आरटीओ सर्कल ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
रस्त्याशेजारी असलेली खोकी, हातगाड्या, शेड हटविण्यात आली. काही ठिकाणी असलेल्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. पुन्हा व्यवसाय थाटून अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आणि रहदारी पोलिसांनी व्यावसायिकांना दिला. यावेळी राबविण्यात आलेल्या कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने राबविण्यात आली.