Tarun Bharat

इंग्लंडचा पाकवर 63 धावांनी विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ कराची

हॅरी बुक आणि बेन डकेट यांच्या शानदार नाबाद अर्धशतकांच्या जोरावर शुक्रवारी येथे झालेल्या तिसऱया टी-20 सामन्यात इंग्लंडने यजमान पाकिस्तानचा 63 धावांनी दणदणीत पराभव करत सात सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील चौथा सामना येथे रविवारी खेळविला जाईल.

या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 3 बाद 221 धावा झोडपडल्या. त्यानंतर इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकने 20 षटकात 8 बाद 158 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 63 धावांनी गमवावा लागला. या मालिकेतील गुरुवारी झालेल्या दुसऱया सामन्यात कर्णधार बाबर आझम आणि मोहमद रिझवान यांना दमदार फलंदाजीची पुनरावृत्ती करता आली नाही.

इंग्लंडच्या डावाला सॉल्ट आणि जॅक्स यांनी प्रारंभ केला. पण तिसऱया षटकातील पहिल्याच चेंडूवर मोहमद हेसनेनने सॉल्टला मोहमद नवाजकरवी झेलबाद केले. त्याने 6 चेंडूत 1 चौकारासह 8 धावा जमविल्या. डेविड मलान आणि जॅक्स यांनी दुसऱया गडय़ासाठी 43 धावांची भर घातली. पाकचा फिरकी गोलंदाज उस्मान कादीरने मलानला हैदरअली करवी झेलबाद केले. त्याने 15 चेंडूत 2 चौकारासह 14 धावा जमविल्या. जॅक्स आणि डकेट यांनी तिसऱया गडय़ासाठी 21 धावांची भर घातली. उस्मान कादीरने जॅक्सला यष्टीरक्षक रिझवानकरवी झेलबाद केले. जॅक्सने 22 चेंडूत 8 चौकारासह 40 धावा जमविल्या.

डकेट आणि ब्रुक्स या जोडीने पाकच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेताना चौथ्या गडय़ासाठी 11.3 षटकात अभेद्य 139 धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडला 221 धावापर्यंत मजल मारता आली. ब्रुकने 35 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 81 तर डकेटने 42 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 70 धावा झळकविल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 6 षटकार आणि 27 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे उस्मान कादीरने 48 धावात 2 तर मोहमद हेसनेनने 36 धावात 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना शान मसूद वगळता पाकचे फलंदाज इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर झटपट बाद झाले. पाकचे पहिले चार फलंदाज केवळ 28 धावात तंबूत परतले होते. इंग्लंडच्या वूडने कर्णधार बाबर आझमला 8 धावावर झेलबाद केले. त्यानंतर टॉप्लेने रिझवानचा 8 धावांवर त्रिफळा उडविला. वूडने हैदरअलीला केवळ 3 धावावर बाद केले. सॅम करेनने इफ्तिकार अहमदचा बळी मिळविला. त्याने 6 धावा जमविल्या. खुषदिल शहा आणि शान मसूद यांनी पाचव्या गडय़ासाठी 62 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या रशीदने खुशदील शहाला झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 29 धावा जमविल्या. शान मसूदने मोहमद नवाजसमवेत सहाव्या गडय़ासाठी 52 धावांची भर घातली. रशीदने नवाजला बाद केले. त्याने 2 चौकारासह 19 धावा जमविल्या. उस्मान कादीरने खाते उघडण्यापूर्वीच धावचित झाला. हॅरीस रौफने 4 धावा जमविल्या. शान मसूद 40 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारासह 65 धावावर तर मोहमद हेसनेन 1 चौकारासह 6 धावावर नाबाद राहिला. पाकच्या डावात 6 षटकार आणि 11 चौकार नेंदविले गेले. इंग्लंडतर्फे मार्क वूड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने 24 धावात 3 तर आदिल रशीदने 32 धावात 2 तसेच टॉप्ले व सॅम करेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 20 षटकात 3 बाद 221 (डकेट नाबाद 70, ब्रुक नाबाद 81, जॅक्स 40, डेविड मलान 14, सॉल्ट 8, हेसनेन 1-36, उस्मान कादीर 2-48), पाक 20 षटकात 8 बाद 158 (शान मसूद नाबाद 65, खुशदील शहा 29, मोहमद नवाज 19, मार्क वूड 3-24, आदिल रशीद 2-32, टॉप्ले 1-22, सॅम करेन 1-37).

Related Stories

सनरायजर्स हैदराबाद, पंजाब लढत आज

Patil_p

सामना संपला, दोस्ताना सुरु!

Omkar B

भारतीय संघाचे लक्ष विजयी घोडदौडीवर

Patil_p

बांगलादेशचा झिंबाब्वेवर तीन धावांनी थरारक विजय

Patil_p

पहिल्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी

Patil_p

शफाली वर्माचे मानांकनातील अग्रस्थान मजबूत

Patil_p
error: Content is protected !!