वृत्तसंस्था/ मँचेस्टर (ब्रिटन)
यजमान इंग्लंडने शुक्रवारी येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 118 धावांनी दणदणीत पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात इंग्लंडची भेदक गोलंदाजी निर्णायक ठरली. या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता. इंग्लंडच्या सॅम करणला सामनावीर घोषित करण्यात आले.
या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून इंग्लंडवर आघाडी घेतली होती. शुक्रवारी मँचेस्टरच्या दुसऱया सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी हा सामना प्रत्येकी 29 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 201 धावात आटोपला. त्यानंतर भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 83 धावात संपुष्टात आणत इंग्लंडने हा सामना मोठय़ा फरकाने जिंकला.
इंग्लंडच्या डावामध्ये लियाम लिव्हिंगस्टोनने 38 तर सॅम करणने 35 धावा जमविल्या. या जोडीने 43 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसने 36 धावात 4 गडी बाद केले. त्याने इंग्लंडची वरची फळी झटपट गुंडाळली. पहिल्या 10 षटकात इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला. रॉयने 14, बेयरस्टोने 28, सॉल्टने 17 तर रुटने 1 धाव जमविली. इंग्लंडची यावेळी 4 बाद 62 अशी केविलवाणी स्थिती होती. दक्षिण आफ्रिकेतर्फे प्रिटोरियस आणि नोर्त्झे यांची गोलंदाजी अधिक भेदक ठरली. केशव महाराजने मोईन अलीला 6 धावावर बाद केल्याने इंग्लंडने 5 बाद 72 धावापर्यंत मजल मारली होती.
कर्णधार बटलर आणि लिव्हिंगस्टोन यांच्या चिवट फलंदाजीमुळे इंग्लंडला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने बटलरला 19 धावावर बाद केले. इंग्लंडची स्थिती यावेळी 6 बाद 101 अशी होती. लिव्हिंगस्टोन आणि सॅम करण यांनी सातव्या गडय़ासाठी 43 धावांची भागीदारी केली. लिव्हिंगस्टोनने नोर्त्झेच्या एका षटकात पहिल्या चार चेंडूवर 3 षटकार आणि 1 चौकार मारला. पण, पाचव्या चेंडूवर नोर्त्झेने त्याला बाद केले.
लिव्हिंगस्टोनने 26 चेंडूत 38 धावा जमविल्या. शम्सीने करणला 35 धावावर बाद केले. इंग्लंडच्या तळाच्या फळीतील डेव्हिड विलीने 21 तसेच अदिल रशीदने 12 धावा जमविल्याने इंग्लंडला 201 धावापर्यंत मजल मारला आली. दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियसने 36 धावात 4, नोर्त्झेने 53 धावात 2, शम्सीने 39 धावात 2 आणि केशव महाराजने एक गडी बाद केला.
इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवातीपासूनच गळती लागली. अदिल रशीदने तसेच मोईन अलीने आपल्या फिरकी गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सपशेल लोटांगण घालणे भाग पाडले.
अदिल रशीदने 29 धावात 3 तर मोईन अली आणि टॉप्ले यांनी प्रत्येकी 2 तसेच विली आणि सॅम करण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिका संघातील क्लासेनने 33, मिलरने 12 आणि प्रेटोरियसने 17 धावा जमविल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने आपले शेवटचे चार गडी केवळ 6 धावात गमविले. त्यांच्या मलान, व्हान डेर डय़ुसेन आणि मॅरक्रम यांना आपले खातेही उघडता आले नाही.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 29 षटकात सर्वबाद 201 (लिव्हिंगस्टोन 38, सॅम करेन 35, रॉय 14, बेयरस्टो 28, सॉल्ट 17, डेविड विली 21, अदिल रशीद 12, प्रिटोरियस 4-36, नोर्त्झे 2-53, शम्सी 2-39, केशव महाराज एक बळी), दक्षिण आफ्रिका सर्वबाद 83 (क्लासेन 33, मिलर 12, प्रिटोरियस 17, अदिल रशीद 3-29, मोईन अली व टॉप्ले प्रत्येकी दोन बळी, विली आणि सॅम करण प्रत्येकी एक बळी).