वृत्तसंस्था /ब्रिस्टॉल
त्ााrन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान इंग्लंडने येथे बुधवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 41 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत 234 धावा जमविल्या. बेअरस्टो आणि सामनावीर मोईन अली यांनी दमदार अर्धशतके झळकवली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेचा हा निर्णय इंग्लंडच्या आक्रमक फटकेबाजीमुळे चुकीचा ठरल्याचे दिसून आले. रॉय आणि कर्णधार बटलर यांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी सुरू केली. बटलरने केवळ 7 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा झोडपल्या.
मोईन अलीचे 18 चेंडूत अर्धशतक
बेअरस्टो आणि मोईन अली यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना चौथ्या गडय़ासाठी 5.5 षटकात 106 धावांची भागीदारी केली. मोईन अलीने टी-20 प्रकारात इंग्लंडतर्फे सर्वात जलद अर्धशतक झळकवले. त्याने 18 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह 52 धावा झळकवल्या. लिव्हींगस्टोन एन्गिडीचा पाचवा बळी ठरला. बेअरस्टोने 53 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांसह 90 धावा झळकवल्या. तो सहाव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 234 धावा डोंगर उभा केला.
हेंड्रिक्स, स्टब्जची अर्धशतके
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेने 20 षटकात 8 बाद 193 धावा जमविल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. हेंड्रिक्सने 33 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 57, क्लासेनने 14 चेंडूत 3 चौकारांसह 20, स्टब्जने 28 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकारांसह 72 तर फेहलुकमवायोने 17 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड- 20 षटकात 6 बाद 234 (बेअरस्टो 90, मोईन अली 52, मलान 43, बटलर 22, एन्गिडी 5-39, फेहलुकमवायो 1-63), द. आफ्रिका- 20 षटकात 8 बाद 193 (स्टब्ज 72, फेहलुकमवायो 22, क्लासेन 20, हेंड्रिक्स 57, ग्लेसन 3-51, टॉपली 2-29, आदिल रशिद 2-17, मोईन अली 1-27).