पंधरा सदस्यीय प्राथमिक संघाची घोषणा, हाच संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडने भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी पंधरा सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर केला असून त्यातून हॅरी ब्रूक व जोफ्रा आर्चर यांना वगळण्यात आले आहे. 5 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.
इंग्लंडने आधीच्या संघातील अनेक खेळाडूंना बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला असून अष्टपैलू बेन स्टोक्सची या संघात वर्णी लागली आहे. स्टोक्सने बुधवारी वनडेतील निवृत्ती मागे घेतल्याचे समजल्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या वनडे मालिकेत तो इंग्लंड संघातून खेळणार आहे. इंग्लंडचे निवड सदस्य ल्युक राईट यांनी हेच पंधरा खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ब्रूकला पहिल्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी यावेळी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले. जोफा आर्चरला वर्ल्ड कपसाठी राखीव म्हणून ठेवणार असल्याचेही राईट यांनी स्पष्ट केले. अनेक खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करीत वर्ल्ड कपसाठी संघात मिळविण्याची धडपड केली होती. पण त्यांना आता निराश व्हावे लागले आहे. 28 सप्टेंबरला अंतिम संघ जाहीर करावयाचा असल्याने या संघात आणखी काही बदल होऊ शकतात. वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची सलामीची लढत न्यूझीलंडविरुद्ध 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.
इंग्लंडचा वर्ल्ड कप प्राथमिक संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशिद, जो रूट, जेसन रॉय, स्टोक्स, रीस टॉपली, डेव्हिड विली, मार्क, वूड, ख्रिस वोक्स.