वृत्तसंस्था/ लंडन
ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुक्रवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने पंधरा जणांचा संघ जाहीर केला. या संघामध्ये जेसॉन रॉयला वगळण्यात आले.
इंग्लंडचा सलामीचा फलंदाज 32 वषीय जेसॉन रॉय गेल्या काही दिवसांपासून फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. आयसीसीच्या या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडच्या निवड समितीने रॉयला वगळण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघामध्ये फिल सॉल्ट याचा समावेश करण्यात आला आहे. चालू वर्षाच्या प्रारंभी सॉल्टने टी-20 प्रकारामध्ये आपले पदार्पण केले होते. 2015 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघामध्ये जेसॉन रॉयचा समावेश होता. जेसॉन रॉयने इंग्लंडच्या वन डे आणि टी-20 संघामध्ये आपले स्थान यापूर्वी भक्कम केले होते. पण त्याने फलंदाजीचा सूर गमावल्याने त्याला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडच्या निवड समितीने वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. रॉयने इंग्लंडतर्फे 171 वन डे सामन्यात 5 हजार 500 धावा जमविल्या असून टी-20 प्रकारामध्ये त्याने 1522 धावा झळकविल्या आहेत. 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्यात रॉयचा वाटा महत्त्वाचा होता.
इंग्लंडचे वेगवान गोलंदाज ख्रिस ओक्स आणि मार्क वूड हे दुखापतीतून आता पूर्णपणे बरे झाले असून त्यांची आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याचप्रमाणे येत्या सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा संघ पाकच्या दौऱयावर खेळणाऱया टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पहिल्यांदा जोस बटलरकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून चालू वर्षाच्या प्रारंभी मॉर्गनने निवृत्ती पत्करल्याने त्याच्या जागी बटलरची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. इंग्लंड संघामध्ये डेव्हिड मलानचे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अलीकडेच झालेल्या मालिकेमध्ये मलानची कामगिरी समाधानकारक झाल्याने निवड समितीने त्याला या आगामी स्पर्धेसाठी पुन्हा संधी दिली आहे. डावखुऱया मलानने टी-20 प्रकारामध्ये 2022 च्या क्रिकेट हंगामात फलंदाजीत दर्जेदार कामगिरी केली आहे. त्याने या कालावधीत 59.66 धावांच्या सरासरीने 358 धावा जमविल्या असून त्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.
इंग्लंड संघ- जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशिद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, टॉपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड. राखीव खेळाडू- मिल्स, डॉसन आणि रिचर्ड ग्लेसन.
पाक दौऱयासाठी इंग्लंड संघ जाहीर
सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा क्रिकेट संघ पाकच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात सात सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. 14 सप्टेंबरला इंग्लंडचा संघ पाकला प्रयाण करणार आहे. ही मालिका कराचीमध्ये खेळविली जाईल. या दौऱयासाठी इंग्लंडने 19 खेळाडूंचा संघ जाहीर केला असून जोस बटलरकडे नेतृत्व सोपविले आहे. दरम्यान, बटलरला सध्या स्नायू दुखापत झाल्याने त्याच्या जागी मोईन अली या दौऱयात काही सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा पाक दौरा सरावासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मालिकेमध्ये पाकचे नेतृत्व बाबर आझमकडे राहील.
इंग्लंड संघ- जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, ब्रुक, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, बेन डकेट, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लेसन, टॉम हेम, विल जॅक्स, डेव्हिड मलान, आदिल रशिद, फिल सॉल्ट, ओले स्टोन, टॉपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ल्युक वूड आणि मार्क वूड.