वृत्तसंस्था/ लंडन
नोव्हेंबरमध्ये होणाऱया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने मंगळवारी 15 जणांचा इंग्लंडचा संघ जाहीर केला. सलामीचा अनुभवी आणि धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयचे संघात पुनरागमन झाले आहे. उभय संघतील या मालिकेला 17 नोव्हेंबरपासून ऍडलेडमध्ये प्रारंभ होईल.
या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंड संघातील 11 खेळाडू ऑस्ट्रेलियातच या मालिकेसाठी राहतील. या मालिकेसाठी जोस बटलरकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. उभय संघातील पहिला सामना 17 नोव्हेंबरला ऍडलेड ओव्हल येथे, दुसरा वनडे सामना 19 नोव्हेंबरला सिडनीत तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 22 नोव्हेंबरला मेलबोर्नमध्ये खेळविला जाईल. तीन सामन्यांची ही मालिका सहा दिवसात संपविली जाणार आहे. इंग्लंडचा वनडे संघ- जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, सॅम बिलिंग्ज, सॅम करन, लियाम डॉसन, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, आदील रशीद, जेसन रॉय, फिल सॉल्ट, ओली स्टोन, जेम्स व्हिन्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, आणि लुक वूड.