वृत्तसंस्था/ लाहोर
तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंडचा क्रिकेट संघ येत्या सप्टेंबर महिन्यात पाकच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि सात सामन्यांची टी-20 मालिका होणार असल्याची घोषणा पीसीबीने मंगळवारी केली आहे.
गेल्या वर्षी इंग्लंड संघाला पाक दौरा अर्धवट सोडावा लागला होता. तत्पूर्वी न्यूझीलंड संघाने सुरक्षा समस्येमुळे पाकचा दौरा रद्द केला होता. इंग्लंड संघासाठी या दौऱयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल, असे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. इंग्लंडच्या पाक दौऱयाला 20 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. उभय संघातील सात टी-20 सामने कराची आणि लाहोर येथे खेळविले जातील. या दौऱयाचा पहिला टप्पा राहिल. या दौऱयानंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ही स्पर्धा संपल्यानंतर इंग्लंडचा संघ डिसेंबर महिन्यात पुन्हा पाकच्या दौऱयावर येणार असून या कालावधीत तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल 24 वर्षानंतर पाकचा दौरा केला होता. न्यूझीलंडचा संघ येत्या डिसेंबरमध्ये पाकच्या दौऱयावर येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या जानेवारीत पाकमध्ये विंडीजविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.