Tarun Bharat

पाकविरुद्ध इंग्लंडची मालिकेत बरोबरी

Advertisements

लाहोर / वृत्तसंस्था

सामनावीर फिल सॉल्टचे मॅचविनिंग नाबाद अर्धशतक तसेच डेव्हिड विली आणि सॅम करण यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर शुक्रवारी येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने यजमान पाकचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव करून 7 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-3 अशी बरोबरी साधली. पाकचा कर्णधार बाबर आझमने टी-20 या प्रकारात 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला असून त्याने भारताच्या विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकात 6 बाद 169 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडने 14.3 षटकात 2 बाद 170 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.

पाकच्या डावामध्ये कर्णधार बाबर आझमची खेळी एकाकी ठरली. त्याने 59 चेंडूत 3 षटकार 7 चौकारांसह नाबाद 87 धावा झळकविल्या. मोहमद हॅरिस 7 धावांवर तर शान मसूर खाते उघडण्यापूर्वी बाद झाले. हैदरअलीने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 14 धावा जमविल्या. बाबर आझम आणि इफ्तिकार अहमद यानी चौथ्या गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी केली. अहमदने 21 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 31 धावा जमविल्या. मोहमद नवाझने 1 षटकारांसह 12 धावा केल्या. असिफअलीने 1 चौकारांसह 9 धावा जमविल्या. बाबर आझम शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला. पाकच्या डावामध्ये 8 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे विली आणि सॅम करण यांनी प्रत्येकी 2 तर टॉप्ले आणि ग्लेसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल सॉल्ट आणि हॅलेस या सलामीच्या जोडीने इंग्लंडच्या डावाला आक्रमक सुरुवात करून देताना 3.5 षटकात 55 धावा झोडपल्या. पाकच्या शदाब खानने हॅलेसला झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. हॅलेस बाद झाल्यानंतर सॉल्ट आणि मलान या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 83 धावांची भर घातली. मलानने 15 चेंडूत 5 चौकारांसह 26 धावा केल्या. सॉल्ट आणि डकेत यांनी विजयाचे सोपस्कार 14.3 षटकात पूर्ण केले. सॉल्टने 41 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 88 तर डकेतने 16 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 26 धावा झळकविल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 4 षटकार आणि 26 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शदाब खानने 34 धावात 2 गडी बाद केले. आता या मालिकेतील सातवा आणि निर्णायक सामना येथे रविवारी खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक-पाक-20 षटकात 6 बाद 169 (बाबर आझम नाबाद 87, हैदरअली 16, इफ्तिकार अहमद 31, मोहमद नवाज नाबाद 12, विली 2-32, सॅम करेन 2-26, टॉप्ले 1-31, ग्लेसन 1-39), इंग्लंड 14.3 षटकात 2 बाद 170 (सॉल्ट नाबाद 88, हॅलेस 27, मलान 26, डकेत नाबाद 26, शदाब खान 2-34).

बाबर आझमची कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

पाकचा कर्णधार बाबर आझमने क्रिकेटच्या टी-20 प्रकारात शुक्रवारी इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला. या सामन्यात बाबर आझमने नाबाद अर्धशतक (87 धावा) झळकविले. टी-20 प्रकारात 3 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा बाबर आझम हा पाचवा फलंदाज आहे. तसेच तो हा पराक्रम करणारा पाकचा पहिला फलंदाज ठरला आहे.

या प्रकारामध्ये भारताच्या विराट कोहलीने 81 डावात 3 हजार धावांचा टप्पा यापूर्वी ओलांडला असून बाबर आझमने कोहलीच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारताच्या रोहित शर्मानेही 3 हजार धावांचा टप्पा यापूर्वी ओलांडला आहे. पाकचा मोहमद हाफीजने या क्रीडा प्रकारात 2514 धावा, बिस्मा महारूफने 2388 धावा जमविल्या आहेत. पाकच्या मोहमद रिझवान तसेच शोएब मलिक यांनीही टी-20 प्रकारात दोन हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Related Stories

दिल्ली कॅपिटल्स-सीएसके आज आमनेसामने

Omkar B

जर्मनीचा व्हेरेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

पाकची द.आफ्रिकेवर 33 धावांनी मात

Amit Kulkarni

पी.टी. उषाची केरळ मुख्यमंत्र्यांना विनंती

Patil_p

पाककडून विंडीजला 329 धावांचे आव्हान

Patil_p

मार्सेली टेनिस स्पर्धेत रुबलेव्ह विजेता

Patil_p
error: Content is protected !!