ट्रेविस हेड सामनावीर, डेविड वॉर्नर मालिकावीर, इंग्लंडचा 3-0 असा फडशा
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
यजमान ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. मंगळवारी मेलबोर्नच्या मैदानावर पावसाच्या अडथळय़ात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 221 धावांनी दणदणीत पराभव केला. हेड आणि वॉर्नर यांनी शानदार शतके झळकविताना सलामीच्या गडय़ासाठी 269 धावांची भागीदारी केली. हेडला सामनावीर तर वॉर्नरला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ट्रेविस हेड आणि डेविड वॉर्नर यांनी तुफान फटकेबाजी करत 38.1 षटकात 269 धावांची भागीदारी केली. मेलबोर्नच्या मैदानावर वनडे सामन्यातील ऑस्ट्रेलियाची 355 ही विक्रमी धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाने 48 षटकात 5 बाद 355 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 31.4 षटकात 142 धावात आटोपला. पावसामुळे पंचांनी हा सामना प्रत्येकी 48 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला होता.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये ट्रेविस हेडने 130 चेंडूत 4 षटकार आणि 16 चौकारासह 152 धावा झळकविल्या. वनडे क्रिकेटमधील हेडचे हे तिसरे शतक आहे. तसेच क्रिकेटच्या या क्रीडा प्रकारातील त्याची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. डेविड वॉर्नर 102 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारासह 106 धावा जमवल्या. स्टीव्ह स्मिथने 2 चौकारासह 21, स्टोइनिसने 12, मिचेल मार्शने 2 षटकार आणि 1 चौकारासह 16 चेंडूत 30, कॅरेने 1 चौकारासह नाबाद 12 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डाव सुरू होण्यापूर्वी पावसाचा दोनवेळा अडथळा आल्याने पंचांनी सामन्यातील षटके कमी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 8 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडचा ओली स्टोन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने 85 धावात 4 तर डॉसनने 75 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. त्यांच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. रॉयने 6 चौकारासह 33, व्हिन्सेने 1 चौकारासह 22, मोईन अलीने 2 चौकारासह 18, सॅम करनने 1 षटकारासह 12, डॉसनने 2 चौकारासह 18 तर विलीने 2 चौकारासह नाबाद 12 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे झम्पाने 31 धावात 4, कमिन्स आणि ऍबॉट यांनी प्रत्येकी 2, हॅजलवूड आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज झम्पाने 11 गडी बाद केले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 6 गडय़ांनी तर त्यानंतर दुसऱया सामन्यात इंग्लंडचा 72 धावांनी पराभव केला होता.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलियात 48 षटकात 5 बाद 355 (हेड 152, वॉर्नर 106, मिचेल मार्श 30, स्मिथ 21, स्टोइनिस 12, कॅरे नाबाद 12, स्टोन 4-85, डॉसन 1-75), इंग्लंड 31.4 षटकात सर्वबाद 142 (रॉय 33, व्हिन्से 22, मोईन अली 18, सॅम करन 12, डॉसन 18, विली नाबाद 12 झम्पा 4-31, कमिन्स 2-25, ऍबॉट 2-45, हॅजलवूड 1-21, मार्श 1-18).