शेवटच्या सामन्यात इंग्लंड आठ गडय़ांनी विजय, हॅरी ब्रुक ‘मालिकावीर’, ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ कराची
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने यजमान पाकचा तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात मंगळवारी इंग्लंडने पाकवर आठ गडय़ांनी दणदणीत विजय मिळविला. इंग्लंडचा हॅरी ब्रुक याला मालिकावीर आणि सामनावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले.
या शेवटच्या सामन्यात पाकने पहिल्या डावात 304 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 354 धावा जमवित 50 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. त्यानंतर पाकचा दुसरा डाव 216 समाप्त झाल्याने इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 167 धावांची जरुरी होती. त्यानंतर इंग्लंडने 2 बाद 112 या धावसंख्येने चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. त्यानंतर विजयासाठी केवळ 55 धावांची जरुरी होती आणि आदल्या दिवशीच्या नाबाद जोडीने आणखी पडझड होऊ न देता 28.1 षटकात 2 बाद 170 धावा जमवित हा सामना आणि मालिका एकतर्फी जिंकून दिली.
मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी केवळ 38 मिनिटांच्या कालावधीत इंग्लंडने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. बेन डकेटने 78 चेंडूत 12 चौकारासह नाबाद 82 तर कर्णधार स्टोक्सने 43 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 35 धावा जमवल्या. क्रॉले 41 चेंडूत 7 चौकारासह 41 तर नाईट वॉचमन रेहान अहमदने 2 चौकारासह 10 धावा केल्या.
पाकचा नवोदित फिरकी गोलंदाज अब्रार अहमदने या मालिकेत पदार्पणातच दर्जेदार कामगिरी केली. त्याने या मालिकेतील दोन कसोटीत 18 बळी मिळवले. तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत त्याने इंग्लंडच्या दुसऱया 78 धावात 2 गडी बाद केले. रावळपिंडीच्या पाटा खेळपट्टीवर इंग्लंडने पहिल्या सामन्यात पाकचा शेवटच्या दिवशी 74 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर मुलतानच्या दुसऱया कसोटीत इंग्लंडने पाकवर 26 धावांनी थरारक विजय नोंदवला होता. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत झालेल्या 45 कसोटी सामन्यात पाकचा हा तिसरा पराभव आहे.
इंग्लंड संघाने तब्बल 17 वर्षानंतर पाकचा दौरा केला आणि त्यांनी कसोटी मालिका एकतर्फी जिंकण्याचा पराक्रम नोंदवला. 2000 नंतर पाक संघाला कसोटी मालिकेत त्यांच्याच भूमीत पराभूत करणारा इंग्लंड हा पहिला संघ आहे. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने 2007 साली पाकचा कसोटी सामन्यात पराभव केला होता. घरच्या मैदानावर पाक संघाचा हा सलग चौथा कसोटी पराभव आहे. या वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियन संघाने पाकचा दौरा केला होता. या दौऱयात उभय संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली आणि ऑस्ट्रेलियाने या मालिकेत पाकचा 1-0 असा पराभव केला होता.
इंग्लंडचा संघाने गेल्या उन्हाळी मोसमापासून कसोटी क्रिकेटच्या प्रकारात आपल्या कामगिरीत सातत्य राखले असून त्यांनी याआधी 10 पैकी 9 सामने जिंकले आहेत. इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉर्डस्च्या मैदानावर कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण त्या मालिकेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. इंग्लंड संघातील बेअरस्टो जखमी असल्याने त्याच्या जागी नवोदित हॅरी ब्रुकला संधी देण्यात आली होती. ब्रुकने पाकच्या दौऱयामध्ये कसोटी मालिकेत सलग तीन शतके नोंदवताना 468 धावा जमवल्या आहेत. कराचीच्या शेवटच्या कसोटीत ब्रुकच्या शानदार शतकामुळे (111) इंग्लंडला पाकवर पहिल्या डावात महत्त्वपूर्ण 50 धावांची आघाडी मिळवता आली.
संक्षिप्त धावफलक – पाक प. डाव 304, इंग्लंड प. डाव 354, पाक दु. डाव सर्वबाद 216, इंग्लंड दु. डाव 28.1 षटकात 2 बाद 170 (क्रॉले 41, डकेट नाबाद 82, रेहान अहमद 10, स्टोक्स नाबाद 35, अब्रार अहमद 2-78).