वृत्तसंस्था/ लंडन
जो रूटने इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असल्याचे शुक्रवारी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने सांगितले. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला ऍशेस मालिकेत 0-4 आणि गेल्या महिन्यात विंडीजविरुद्धच्या मालिकेत 0-1 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे.
‘विंडीज दौऱयाहून परतल्यानंतर पूर्ण विचार करून इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा मी निर्णय घेतला,’ असे रूटने म्हटले आहे. ‘माझ्या कारकिर्दीतील हा आजवरचा सर्वात आव्हानात्मक निर्णय होता. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या स्नेहय़ांशी चर्चा केल्यानंतर, पद सोडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जाणवले. देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असून गेल्या पाच वर्षातील कामगिरीचा मला अभिमान वाटतो. इंग्लिश क्रिकेटमधील सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळावयास मिळाली, हा माझा सन्मान आहे, असे मी मानतो,’ अशा भावना रूटने व्यक्त केल्या.
31 वर्षीय रूटच्या नावावर इंग्लंडचा कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम नोंदला गेला आहे. त्याने 27 विजय मिळविताना 26 सामने जिंकणारा मायकेल वॉन आणि 24 विजय मिळविलेल्या ऍलेस्टर कूक व अँड्रय़ू स्ट्रॉस यांना मागे टाकले. गेल्या वर्षभरातील त्याची कामगिरी मात्र निराशाजनक झाली असून मागील वर्षी पहिल्या तीन कसोटी जिंकल्यानंतर गेल्या 17 सामन्यांत त्याला केवळ एक विजय मिळविता आला तर 11 सामने गमविले आणि 5 सामने अनिर्णीत राखले.
‘कर्णधारपदाच्या कारकिर्दीत रूटने आदर्शवत कामगिरी केली असून त्याने नेतृत्वाची जबाबदारी आणि वैयक्तिक कामगिरी यांचा उत्तम समतोल साधला होता. त्याने आघाडीवर राहून नेतृत्व केले असून अन्य कर्णधारांपेक्षा त्याने जास्त विजय मिळविले आहेत. त्यात काही घरच्या व काही विदेशी भूमीवरील विजयांचा समावेश आहे,’ असे ईसीबीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले.